राजोली येथील स्थिती : चार वर्षांपूर्वी बांधकाम; कच्च्या रस्त्याच्या दोन्ही कडा गेल्या वाहूनधानोरा : पावसाळ्यात वारंवार मार्ग बंद होत असल्यामुळे राजोली व परिसरातील नागरिकांनी गावानजीकच्या कठाणी नदीवर पूल बांधण्याची मागणी लावून धरली. या मागणीची दखल घेऊन शासनाने गावालगतच्या कठाणी नदीवर चार वर्षापूर्वी पुलाचे बांधकाम केले. येथून दळणवळणही सुरू झाले. परंतु पुलाच्या दोन्ही बाजंूनी पुलाला जोडणारा पक्का रस्ता बांधण्यात आला नाही. त्यामुळे येथे पूल असूनही मार्ग निरूपयोगी ठरत आहे. धानोरा तालुक्याच्या राजोली मार्गावर परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी कठाणी नदीवर पूल बांधण्यात आला. पूल बांधून रस्ताही तयार करण्यात आला. परंतु पुलाच्या दोन्ही टोकाला जोडणारा रस्ता कच्च्या स्वरूपाचा तयार केल्याने पहिल्याच पुरात दोन्ही टोकाकडील रस्ता वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करणे कठिण झाले. पावसाळ्यात नदीतून पुराचे पाणी व पूल असतानाही रस्त्याअभावी वर चढता न येणे अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेला पूल निरूपयोगी ठरत आहे. येथील पुलाच्या दोन्ही बाजुंनी पक्क्या रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनेही सादर करण्यात आली. परंतु संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. यामार्गे शालेय विद्यार्थी व नागरिकांचे आवागमन असते. पावसाळ्यात राजोली येथील शाळकरी मुली नवरगावमार्गे धानोऱ्याला शिक्षणासाठी येतात. त्यामुळे दोन किमी ऐवजी त्यांना १२ किमीची पायपीट करावी लागते. (तालुका प्रतिनिधी)
पूल असूनही मार्ग निरूपयोगी
By admin | Updated: October 26, 2016 01:59 IST