उपचाराअभावी रानगव्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:24 IST2018-05-05T23:24:38+5:302018-05-05T23:24:38+5:30
आलापल्ली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या कक्ष क्रमांक ४३ मध्ये रानगव्याचा मृत्यू झाला, असून सदर रानगव्याचा मृत्यू हा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे झाला असून यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

उपचाराअभावी रानगव्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : आलापल्ली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या कक्ष क्रमांक ४३ मध्ये रानगव्याचा मृत्यू झाला, असून सदर रानगव्याचा मृत्यू हा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे झाला असून यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
रानगवा हा शाकाहारी वर्गातील मोठा प्राणी आहे. रानगव्यांची संख्या देशात अतिशय कमी असल्याने त्याला शेड्युल क्रमांक १ मध्ये टाकण्यात आले आहे. सुदैवाने गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर परिसरातील कोलामार्का या भागात रानगव्यांचे वास्तव्य आहे. या प्राण्यांचे महत्त्व लक्षात घेऊन या कोलामार्का परिसराला रानगव्यांचे अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
चार ते पाच दिवसांपूर्वी एक रानगवा जखमी अवस्थेत आलापल्ली परिसरातील जंगलात लंगडत फिरत होता. याची माहिती काही वन्यप्रेमींनी आलापल्ली वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांना दिली. मात्र त्यांनी रानगव्याकडे कायमचे दुर्लक्ष केले. तर दुसरीकडे मात्र रानगवा मिळतच नसल्याची माहिती वरिष्ठांना देत होते. त्यामुळे वरिष्ठांशी सुध्दा दिशाभूल झाली. आलापल्ली येथील वन व्यवस्थापन समिती, पेसा कोष समिती व वनहक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून रानगव्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचाराअभावी रानगव्याचा मृत्यू झाला. रानगवा हा दूर्मिळ प्राणी आहे. तरीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे. या रानगव्याला पायखूर हा संसर्गजन्य रोग झाला होता. हाच रोग इतरही प्राण्यांना होण्याची शक्यता आहे. आलापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांना फोन करून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद होता.