सूर्यापल्ली भागातील रस्ते चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:01 IST2019-09-10T00:00:56+5:302019-09-10T00:01:37+5:30
कधी मुसळणार तर कधी रिमझिम मात्र पावसाने उसंत घेतली नाही. अतिवृष्टीमुळे सूर्यापल्ली नाल्याला पूर आला. हा पूर ओसरला. मात्र नाल्यावर जडाऊ लाकडांचा कचरा जमा झाला आहे. राजाराम-कमलापूूर मार्गावरील एक किमी अंतरावरील सूर्यापल्ली गावाजवळचा रस्ता पूर्णत: खचला. रायगट्टा गावाजवळच्या नाल्याजवळचा रस्ता खचला आहे.

सूर्यापल्ली भागातील रस्ते चिखलमय
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात संततधार पाऊस झाल्याने तसेच पूरपरिस्थितीमुळे अनेक डांबरी व खडीकरणाचे रस्ते खराब झाले. पुरामुळे गावागावाला जोडणारे रस्ते चिखलमय झाले असून नाल्याजवळ दोन्ही बाजूने कचरा साचला आहे. एकूणच सूर्यापल्ली भागातील रस्त्यांची पावसामुळे दुर्दशा झाली आहे.
२५ जुलैपासून ६ सप्टेंबरपर्यंत कमलापूर भागात पाऊस झाला. कधी मुसळणार तर कधी रिमझिम मात्र पावसाने उसंत घेतली नाही. अतिवृष्टीमुळे सूर्यापल्ली नाल्याला पूर आला. हा पूर ओसरला. मात्र नाल्यावर जडाऊ लाकडांचा कचरा जमा झाला आहे. राजाराम-कमलापूूर मार्गावरील एक किमी अंतरावरील सूर्यापल्ली गावाजवळचा रस्ता पूर्णत: खचला. रायगट्टा गावाजवळच्या नाल्याजवळचा रस्ता खचला आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात या भागातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था होते. प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यानंतर दरवर्षी रस्त्यांची डागडुजी केली जाते. मात्र ही डागडुजी तात्पुरत्या स्वरूपाची असते. त्यामुळे हे रस्ते अधिक काळ टिकत नाही.
गेल्या चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात पावसाने कहर केला. वर्षभराच्या पावसाने चार महिन्यांतच सरासरी गाठली. विशेष म्हणजे अहेरी उपविभागाच्या भामरागड, सिरोंचा व अहेरी या तीन तालुक्यात बऱ्याचदा अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीने खडीकरण रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. शेताकडे जाणारे व गावागावाला जोडणारे कच्च्या स्वरूपाच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील रस्त्यांचीही अशाच प्रकारे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.