अन् पोलिसांच्या पुढाकारातून गावकऱ्यांसाठी बनला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 05:00 IST2021-12-23T05:00:00+5:302021-12-23T05:00:34+5:30
गावकऱ्यांनी रस्त्याची मागणी केली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा येथे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यांनी ‘गाव बंद नक्षल बंद’ योजनेअंतर्गत विशेष कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क केला. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने जवळजवळ ५० लाखांचे काम मंजूर केले. त्यापैकी कोटापल्ली गावात ५० मीटर अंतराचा सिमेंट रोड तयार करून देण्यात आला.

अन् पोलिसांच्या पुढाकारातून गावकऱ्यांसाठी बनला रस्ता
लाेकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : जिथे इतर विभागांचे दुर्लक्ष होते तिथे पोलिसांनाच नागरिकांच्या मदतीसाठी धावून जावे लागते. याचा प्रत्यय तालुक्यातील दोन गावातील नागिरकांना नुकताच झाला. ग्रामभेटीदरम्यान गावकऱ्यांनी आपली मागणी पोलिसांपुढे मांडली. त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला आणि गावकऱ्यांच्या मागणीनुसार ५० लाखांचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार झाला. दि.२२ ला पोलीस अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या पोलीस दादलोरा खिडकी या योजनेमार्फत उपपोलीस ठाणे रेगुंठा हद्दीतील मौजा कोटापल्ली, मोयाबिनपेठा या गावांमध्ये पेट्रोलिंगदरम्यान ग्राम भेट घेण्यात आल्या. त्या भेटीमध्ये गावकऱ्यांनी रस्त्याची मागणी केली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा येथे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यांनी ‘गाव बंद नक्षल बंद’ योजनेअंतर्गत विशेष कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क केला. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने जवळजवळ ५० लाखांचे काम मंजूर केले. त्यापैकी कोटापल्ली गावात ५० मीटर अंतराचा सिमेंट रोड तयार करून देण्यात आला.
या रस्त्याच्या लोकार्पणप्रसंगी कोटापल्ली गावातील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, इतर सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व मोयाबिनपेठाचे सरपंच उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.
आणखी चार कामांना मिळाली मंजुरी
- यावेळी मोयाबीनपेठाचे सरपंच यांनी गावातील चार सीसी रोडची कामे ‘गाव बंद नक्षल बंद’ विशेष कृती कार्यक्रमांतर्गत मंजूर झाली असून ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांचे आभार मांडले. कार्यक्रमाला उपपोलीस स्टेशन रेगुंठाचे प्रभारी अधिकारी विजय सानप, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, निजाम सय्यद व सर्व पोलीस अंमलदार हजर होते.