विमानतळ केल्यास पाणीटंचाईचा धोका? भूसंपादनाविरूध्द गावकरी एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:12 IST2025-03-01T17:12:32+5:302025-03-01T17:12:59+5:30

मुडझा ग्रामसभेत ठराव : जमीन देण्यास गावकऱ्यांचा नकार

Risk of water shortage if the airport is build? Villagers united against land acquisition | विमानतळ केल्यास पाणीटंचाईचा धोका? भूसंपादनाविरूध्द गावकरी एकवटले

Risk of water shortage if the airport is build? Villagers united against land acquisition

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
जिल्हा मुख्यालयालगत विमानतळ उभारणीसाठी तीन ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला आहे. याचीच री ग्रामपंचायत मुडझा बु व मुडझा तुकूम येथील शेतकऱ्यांनी ओढली. सुपीक जमिनीवर विमानतळ विकसित करण्यासाठी भूसंपादनाकरिता शेतजमिनी देण्यास ग्रामसभेने विरोध दर्शविला असून याबाबतचा ठराव २८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला.


गडचिरोली विमानतळ विकसित करण्यासंबंधी भूसंपादन विषयक शिफारस ठराव सादर करण्याबाबत विशेष ग्रामसभा शुक्रवारी घेण्यात आली. सदर ग्रामसभेत खातेदार शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास स्पष्ट नकार दिला. शेतकरी खातेदार सदर शेतीवर दुबार पीक घेत आहेत. बहुसंख्य शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन विमानतळ विकसित करण्यासाठी भूसंपादनाकरिता जात असल्याने शेतकरी खातेदार भूमिहीन होण्याचा धोका आहे. भविष्यात त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन राहणार नाही. उपासमारीची वेळ येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.


... तर नागरिकांना होणार आठ किमीचा फेरा
मुडझा ते गडचिरोली येथे येण्यासाठी राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्ता अवघा एक ते दीड कि.मी. अंतराचा आहे. सदर रस्ता बंद झाल्यास ग्रामस्थांना वाकडीमार्गे गडचिरोली येथे ८ किमीच्या फेऱ्याने जंगलातून जावे लागणार आहे. या भागात रात्रीच्या सुमारास वाघाचा संचार असतो. मागील वर्षी नागरिकांना तीन वाघ रस्ता ओलांडताना दिसून आले होते. त्यामुळे परिसरात दहशत होती.


पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका
मुडझा बु. येथे दोन मामा तलाव असून विमानतळ विकसित करण्याकरिता तलावाचे क्षेत्र जात आहे. त्यामुळे शेतीला व पाळीव जनावरांना पाणी कायमचे उपलब्ध होणार नाही. पाणीटंचाई निर्माण होईल. त्यामुळे येथील जमिनी भूसंपादित करू नयेत. इतर ठिकाणी विमानतळ विकसित करावा, असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते पारित करण्यात आला.

Web Title: Risk of water shortage if the airport is build? Villagers united against land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.