‘परिवर्तन, एक विचार’ नाटकाने रसिक मंत्रमुग्ध
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:41+5:302016-04-03T03:50:41+5:30
सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागाच्या वतीने आरमोरी मार्गावरील संस्कृती लॉनच्या सभागृहात ‘दूत समतेचा, जागर महामानवाचा’...

‘परिवर्तन, एक विचार’ नाटकाने रसिक मंत्रमुग्ध
सामाजिक न्याय विभागामार्फत आयोजन : बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार
गडचिरोली : सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागाच्या वतीने आरमोरी मार्गावरील संस्कृती लॉनच्या सभागृहात ‘दूत समतेचा, जागर महामानवाचा’ या उपक्रमांतर्गत ‘परिवर्तन, एक विचार’ या दोन अंकी नाटकाचे आयोजन शनिवारी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले. यादरम्यान कलावंतांनी सादर केलेल्या नाटकामुळे रसीक मंत्रमुग्ध झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांचे विचार प्रत्येक घरात रूजविण्यासाठी महाराष्ट्र शासन हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करीत आहे. या निमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
याच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली येथे राजरत्न पेटकर यांच्या कथेवरून सुशील सहारे यांनी लिखीत ‘परिवर्तन, एक विचार’ या दोन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले. नाटकाचे उद्घाटन गडचिरोलीचे समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डी. के. मेश्राम, प्रकाश गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
नाटकाच्या सभागृहात व बाहेर व प्रोजेक्टर लावण्यात आले होते. त्यामुळे ज्या नागरिकांना जागेअभावी प्रत्यक्ष नाटक बघता येत नव्हते, असे नागरिक प्रोजेक्टरसमोर उभे राहून नागरिक नाटकाचा आस्वाद घेत होते. पोवाडा व नाटक यांच्या माध्यमातून सामाजिक समतेची असलेली गरज व बाबासाहेबांनी बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष मांडण्यात आला. नाटकाच्या पूर्वी जवळपास अर्धा तास महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमातून देण्यात आली. नाटकामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले. (नगर प्रतिनिधी)