दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:27 IST2025-09-23T13:23:03+5:302025-09-23T13:27:42+5:30

छत्तीसगडच्या अबुजमाड जंगलात चकमक : मोठा शस्त्रसाठा जप्त

Reward of 10 crores, four-hour encounter! Maoists who were lying in ambush were killed by soldiers | दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा

Reward of 10 crores, four-hour encounter! Maoists who were lying in ambush were killed by soldiers

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील नारायणपूर जिल्ह्यातील अबुजमाड जंगलात २२ सप्टेंबर रोजी सकाळी झालेल्या चकमकीत दोन जहाल माओवादी नेते व केंद्रीय समिती सदस्य ठार झाले. कादरी सत्यनारायण ऊर्फ कोसा (६७) आणि कट्टा रामचंद्र रेड्डी ऊर्फ विकल्प ऊर्फ राजूदादा (६१) अशी त्यांची नावे असून, दोघांवर मिळून तब्बल १० कोटींचे बक्षीस जाहीर होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या अबुजमाडच्या घनदाट जंगलात काही माओवादी दबा धरून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार माओवादविरोधी अभियान सुरू होते. दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी गोळीबार केला. जवानांच्या प्रत्युत्तरात काही तास चकमक रंगली आणि अखेर सुरक्षा दलाला निर्णायक यश मिळाले. दोन जहाल माओवाद्यांना ठार केले. घटनास्थळावरून मृतदेहाबरोबरच एके-४७ रायफलसह शस्त्रसाठा, स्फोटके व मोठ्या प्रमाणावर प्रचार साहित्य जप्त करण्यात आले.

बस्तरचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी यांसदर्भात सविस्तर माहिती दिली. अतिशय कठीण व प्रतिकूल परिस्थितीत जवानांनी ही कारवाई पार पाडली, याबद्दल त्यांनी जवानांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

कोसा हा नक्षल चळवळीतील प्रभावी नेता व महासचिवपदाचा दावेदार मानला जात होता. तर, वकिली शिक्षण घेतलेला विकल्प हा प्रवक्त्याची जबाबदारी सांभाळत होता. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीतील सी- ६० जवानांच्या कारवाईत हे दोघे थोडक्यात बचावले होते, पण छत्तीसगडमध्ये अखेर ते सुरक्षा यंत्रणेच्या बंदुकीचा निशाणा ठरले. गेल्या महिन्यातील ही चौथी मोठी कारवाई आहे. याआधी केंद्रीय समिती सदस्य मनोज गरियाबंद येथे ठार झाला, सुजाताने तेलंगणात शरणागती पत्करली, तर सहादेव सोरेन झारखंडमध्ये मारला गेला होता. त्यामुळे अल्पावधीतच नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

कोसा, विकल्पची दंडकारण्यात दहशत

  • कादरी सत्यनारायण ऊर्फ कोसा व कट्टा रामचंद्र रेड्डी ऊर्फ विकल्प ऊर्फ राजू दादा या जोडीचा प्रभाव होता.
  • त्यांची दंडकारण्यात मोठी दहशत हाती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. ते मूळचे तेलंगणाचे होते. कोसा हा काम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (माओवादी) या प्रतिबंधित पक्षाच्या महासचिव पदाचा प्रमुख दावेदार होता, तर वकिलीचे शिक्षण घेतलेला कट्टा रामचंद्र रेड्डी ऊर्फ विकल्प ऊर्फ राजू दादा हा माओवादी चळवळीशी संबंधित प्रसिद्धी पत्रक काढायचा.
  • कोसाची पत्नी राधाक्का ही माओवादी चळवळीत कमांडर होती तर विकल्पची पत्नी मालती ऊर्फ शांतीप्रियाला ही देखील चळवळीत सक्रिय होती. मालतीचा काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या रायपूर येथे अटक करण्यात आली होती.

Web Title: Reward of 10 crores, four-hour encounter! Maoists who were lying in ambush were killed by soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.