ओसाड बगीचा पुनर्जीवित करा
By Admin | Updated: May 11, 2014 23:39 IST2014-05-11T23:39:22+5:302014-05-11T23:39:22+5:30
गोंदिया-चांदा फोर्ट रेल्वे मार्गावरील देसाईगंज येथील रेल्वे प्रशासनाने ३५ लाख रूपये खर्च करून बगीचा तयार केला होता.

ओसाड बगीचा पुनर्जीवित करा
ंदेसाईगंज : गोंदिया-चांदा फोर्ट रेल्वे मार्गावरील देसाईगंज येथील रेल्वे प्रशासनाने ३५ लाख रूपये खर्च करून बगीचा तयार केला होता. परंतु स्थानिक रेल्वे प्रशासन व तत्कालिन रेल्वे सल्लागार समितीच्या दुर्लक्षितपणामुळे सद्यस्थितीत बगीचाची अवस्था दयनीय झाली आहे. बगीचावर खर्च करण्यात आलेला ३५ लाखाचा निधी वाया गेल्याचे चित्र दिसत आहे. नवनियुक्त सल्लागार समितीने या बाबीकडे लक्ष देऊन ओसाड बगीचा पुनर्जीवित करून जनतेसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे. १६ फेब्रुवारी २००९ ला रेल्वेचे महाप्रबंधक कस्तुरीरंजन यांच्या हस्ते येथील रेल्वे स्थानकालगत बगीचाची ३५ लाख रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बगीचाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर एका वर्षातच या बगीचाची दुरवस्था झाली. देसाईगंज येथील रेल्वेस्थानकाच्या ठिकाणी बगीचा बनविण्याची व तो सुकविण्याची ही पहिलीच घटना नव्हे तर १७ एप्रिल १९९३ मध्ये तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते सुध्दा बगीचाचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र रेल्वे प्रशासनाच्या नेहमीच्या दुर्लक्षितपणामुळे लोकार्पण करण्यात आलेल्या बगीचाही लवकरच नष्ट झाला. २००९ मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या बगीचाचे लोकार्पण करण्यात आले. परंतु रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे याही बगीचाची इतर बगीचाप्रमाणे दुर्दशा झाली व सद्यस्थितीत हा बगीचा समुळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नागरिकांच्या प्रवाशांच्या रेल्वेविषयीच्या समस्या निराकरणासाठी स्थानिक लोकांमध्ये रेल्वेच्या प्रशासनात असलेल्या समस्या निदर्शनास आणून देणे व सोयीसुविधांसाठी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करण्यासाठी रेल्वे सल्लागार समिती स्थापन करण्यात येते. आजपर्यंत या सल्लागार समितीने येथील समस्यांच्या बाबतीत अनभिज्ञच राहून केवळ आपले नाव कागदोपत्रीच ठेवले आहे. सद्यस्थितीत रेल्वेच्या सल्लागार समितीत नवे पदाधिकारी आले असून त्यांनी रेल्वे स्टेशनवर रेल्वेविषयी असणार्या प्रवाशांच्या समस्या किंवा प्रवाशांना बैठकीसंदर्भात असलेल्या समस्यांचा पाठपुरावा करणे सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे नवनियुक्त सल्लागार समितीने ३५ लाख रूपये खर्च करून सद्यस्थितीत दुरवस्थेत असलेला ओसाड बगीचा पुनर्जीवित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला बाध्य करून ३५ लाखाचा निधी सत्कार्यी लावावा, अशी अपेक्षा नागरिक व प्रवाशांनी व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)