आलापल्ली ग्रामपंचायतीच्या शुध्द पेयजल केंद्रालगतचा गाळा ग्रामसभेचा बनावट ठराव बनवून, एका व्यावसायिकाला मंजूर करण्यात आला. तसेच भाडेकरारनामादेखील लिहून व्यावसायिकाकडून ५० हजार रुपये अनामत रक्कमदेखील ग्रामपंचायतीने घेतली. या बनावट तथा बोगस ठरावाच्या संबंधाने आलापल्ली ग्रामपंचायतीच्या समस्त ४४८ ग्रामसभा सदस्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अहेरी यांच्याकडे तक्रार केली.
गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीकरिता चौकशी अधिकारी म्हणून पी. आर. रायपुरे नियुक्ती केली होती. ते आलापल्ली ग्रामपंचायतीचे प्रशासकदेखील होते. याचाच अर्थ ते प्रशासक व या प्रकरणाचे चौकशी अधिकारीदेखील होते. हे प्रकरण चौकशीच्या अधिन आहे. हे तत्कालीन प्रभारी ग्रामविकास अधिकारी एस. एस. गेडाम तथा तत्कालीन प्रशासक पी. आर. रायपुरे यांना माहीत असताना, गाळ्याची अनामत रक्कम संबंधितांना परस्पर परत देऊन टाकली. या प्रकरणाची चाैकशी करून एस. एस. गेडाम, पी. आर. रायपुरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हाेत आहे.