वाढत्या कोरोनामुळे जिल्ह्यातील व्यवहारांवर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:38 IST2021-03-17T04:38:07+5:302021-03-17T04:38:07+5:30
राज्यातच नाही, तर गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मंगळवारी २६ रुग्णांची भर पडली. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २४० वर ...

वाढत्या कोरोनामुळे जिल्ह्यातील व्यवहारांवर निर्बंध
राज्यातच नाही, तर गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मंगळवारी २६ रुग्णांची भर पडली. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २४० वर पोहोचली आहे. कोरोनाचे रुग्ण अधिक वाढू नये म्हणून जास्तीत जास्त आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’नुसार कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून १५ मार्च ते ३१ मार्च २०२१ पर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
सर्व धार्मिक संस्थांना किती भाविकांना एका तासात धार्मिक स्थळांना भेट देता येईल याची आकडेवारी जाहीर करून, उचित खबरदारी घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
या आदेशाचे पालन न करणारी / उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानून व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
(बॉक्स)
या बाबींना आल्या मर्यादा
सर्व सिनेमागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेत चालू राहतील. मास्क घातल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस प्रवेश नसणार आहे. प्रत्येक ग्राहकाचे, व्यक्तीचे तापमान मोजण्यात येणार आहे. तापमान १००.६ फॅ. किंवा ९८.६ सेल्सिअस पेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीस प्रवेश नसेल, हँड सॅनिटायझर प्रवेशद्वारावर व उचित ठिकाणी उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे. संबंधित आस्थापनांनी मास्क व सुरक्षित अंतराचे पालन व्हावे म्हणून आवश्यक कर्मचारीवर्ग नेमावेत. सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात येत आहे. लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी राहणार नाही. अंत्यविधीकरिता जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी राहील.
गृहविलगीकरणात राहणार बंधने
गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तीने आपली माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून १४ दिवस गृहभेट दिली जाणार आहे. गृहविलगीकरणाचा स्टीकर संबंधित कोविड सकारात्मक रुग्णाच्या घरी चिकटवला जाणार आहे. संबंधित व्यक्तींच्या घरातील लोकांच्या हालचालींवर निर्बंध राहतील. या बाबीचे उल्लंघन केल्यास संबंधितांना कोविड केअर सेंटरला हलविण्यात येणार आहे.