शर्मांना आदिवासींची आदरांजली
By Admin | Updated: December 17, 2015 01:36 IST2015-12-17T01:36:45+5:302015-12-17T01:36:45+5:30
डॉ. बी. डी. शर्मा सुरूवातीला एक अधिकारी म्हणून त्यानंतर व्यवस्थेद्वारे सामान्य कष्टकरी, दलित आदिवासी यांच्यावर होणाऱ्या शोषणाविरोधात संघर्ष उभारण्यासाठी आंदोलनाची सुरूवात करणारे,....

शर्मांना आदिवासींची आदरांजली
गिरोल्यात संघर्ष संकल्प सभा : बी. डी. शर्मा यांच्या कार्याला दिला उजाळा
धानोरा : डॉ. बी. डी. शर्मा सुरूवातीला एक अधिकारी म्हणून त्यानंतर व्यवस्थेद्वारे सामान्य कष्टकरी, दलित आदिवासी यांच्यावर होणाऱ्या शोषणाविरोधात संघर्ष उभारण्यासाठी आंदोलनाची सुरूवात करणारे, जनमाणसात क्रांतिकारी विचार रूजविणारे व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन त्यांचे जुने सहकारी विजय लापालीकार यांनी केले.
धानोरा तालुक्यातील गिरोला येथे आयोजित संघर्ष संकल्प सभेत बुधवारी ते बोलत होते. सदर सभेला भारत जन आंदोलनाचे जिल्हा संयोजक माजी आ. हिरामण वरखडे, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. महेश कोपुलवार, रोहिदास राऊत, हिरालाल येरमे, कुसूम आलाम, धनकर, प्रकाश ताकसांडे, विनोद झोडगे, सुखरंजन उसेंडी, केशव गुरनुले, महेंद्र ठाकरे, रामदास जराते आदी उपस्थित होते.
डॉ. बी. डी. शर्मा यांचे ६ डिसेंबरला दु:खद निधन झाले. त्यांच्या जीवन संघर्षाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शेकडो ग्रामसभा, विविधी पुरोगामी पक्ष, संघटनांच्या वतीने ‘संघर्ष संकल्प’ रूपात आदरांजली वाहण्यात आली. यावेळी रेखाटोला, गिरोला, खुटगाव, दुधमाळा इलाक्यातील ग्रामसभांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
पेसा व वन अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वांनी ग्रामसभांचा विकास साधायला हवा, आपल्या अधिकारासाठी आदिवासी, गैर आदिवासी यांनी अभ्यासूपणे आपले हक्क व न्यायासाठी आवाज उठवावा तेव्हाच डॉ. शर्मा यांना आदरांजली राहिल, असे प्रतिपादन डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. भारत जनआंदोलन व संघर्षशाली जनता डॉ. शर्मा यांच्या कार्याला पुढे नेत राहिल, असा संकल्प हिरामण वरखडे यांनी केला. जल, जंगल, जमीन, संसाधनांची मालकी व रक्षणाचा संघर्ष डॉ. शर्मा यांनी मजबूत केला. संसाधन, उद्योग हे जनतेच्या मालकीचे असावेत, असा त्यांचा आग्रह होता, असे उद्गार मान्यवरांनी काढले.