लाहेरी-हिंदेवाडा रस्त्याची नागरिकांनी केली दुरूस्ती
By Admin | Updated: October 24, 2016 01:55 IST2016-10-24T01:55:05+5:302016-10-24T01:55:05+5:30
तालुक्यातील लाहेरी-हिंदेवाडा या ९ किमी अंतराच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते.

लाहेरी-हिंदेवाडा रस्त्याची नागरिकांनी केली दुरूस्ती
श्रमदानातून खड्डे बुजविले : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य
भामरागड : तालुक्यातील लाहेरी-हिंदेवाडा या ९ किमी अंतराच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. अखेर लाहेरी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या परिसरातील पाच गावातील नागरिकांनी एकत्र येऊन सदर रस्त्यावरील खड्डे बुजविले. श्रमदानातून लाहेरी-हिंदेवाडा रस्त्याची दुरूस्ती केली.
लाहेरी-हिंदेवाडा रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी लाहेरी परिसरातील नागरिकांनी केली होती. मात्र या रस्त्याच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाने पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यानंतर अखेर लाहेरी, भुसेवाडा, मुरंगल, कुक्कामेट्टा, मल्लपोडूर या पाच गावातील नागरिकांनी सदर रस्ता दुरूस्त करण्याचा निर्धार केला. सदर पाचही गावातील एकत्र आले व त्यांनी लाहेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुधीर घाडगे, पोलीस उपनिरीक्षक सत्यमसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानातून सदर रस्त्याची दुरूस्ती केली. यावेळी पोलीस जवानांनीही श्रमदान करून रस्ता दुरूस्तीस सहकार्य केले. लाहेरी-हिंदेवाडा या ९ किमी अंतराच्या रस्त्यावर डांबरीकरण केव्हा होणार अशी प्रतीक्षा लाहेरी भागातील नागरिक करीत आहेत. भामरागड तालुक्यातील लाहेरी हे गाव अतिसंवेदनशील भाग असून शासन व प्रशासनाचे या भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. लाहेरी भागात अनेक मूलभूत समस्या ऐरणीवर आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)