‘केबीसी’त जिंकलेल्या रकमेतून तलावांची दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:51 IST2018-09-09T00:49:51+5:302018-09-09T00:51:35+5:30
एका टीव्ही वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शो मध्ये शुक्रवारी डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी जिंकलेली रक्कम भामरागड तालुक्यातील तलावांच्या दुरूस्ती व नवीन तलावांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा मनोदय आमटे परिवाराने व्यक्त केला आहे.

‘केबीसी’त जिंकलेल्या रकमेतून तलावांची दुरूस्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एका टीव्ही वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शो मध्ये शुक्रवारी डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी जिंकलेली रक्कम भामरागड तालुक्यातील तलावांच्या दुरूस्ती व नवीन तलावांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा मनोदय आमटे परिवाराने व्यक्त केला आहे.
७ सप्टेंबर प्रसारित झालेल्या या शो मधील ‘कर्मवीर’ या विशेष भागात हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक आणि ज्येष्ठ समाजसेवी डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आमटे दाम्पत्याने दुर्गम आदिवासी क्षेत्रात राहून तेथील नागरिकांना दिलेल्या आरोग्य सेवेचा परिचयही करून देण्यात आला. आमटे दाम्पत्याने या कार्यक्रमादरम्यान विविध प्रश्नांना योग्य उत्तरे देऊन २५ लाख रुपये जिंकले. यावेळी कार्यक्रमाचे संचालनकर्ते असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनी जिंकलेल्या रकमेएवढीच रक्कम अॅक्सिस बँक फाऊंडेशनच्या वतीने आमटे दाम्पत्याच्या कार्यासाठी देत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार एकूण ५० लाख रुपयांची रक्कम त्यांना या कार्यक्रमातून मिळाली आहे.
यासंदर्भात आमटे दाम्पत्याचे चिरंजीव डॉ.अनिकेत आमटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, त्या रकमेतून ज्या गावांमध्ये तलावांचे खोलीकरण किंवा नवीन तलाव बनविण्याची गरज आहे ते काम केले जाईल. हे ते गावकरीच ठरवतील असेही त्यांनी सांगितले. त्या तलावांमधून शेतीसाठी पाणी मिळण्यासोबतच मासेमारीही केली जाणार आहे.
या गावांत झाली कामे
लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने यापूर्वी भामरागड तालुक्यातील जिंजगाव, हेमलकसा गावांत २ तलाव, कुमरगुडा, दर्भा, नेलगुंडा, पीडीमिली, हलवेर, नारगुंडा, कोडपे, दुडेपल्ली, मडवेली, कोयनगुडा, टेकला येथे तलावांची निर्मिती आणि खोलीकरण करण्यात आले आहे. कोईनगुडा आणि जिंजगाव येथे पाण्याची टाकी, विहीर, सोलरपंप आणि नळाची पाइपलाईन टाकण्यात आली.