धोडराज-इंदेवाडा मार्गाची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:36 IST2021-04-17T04:36:24+5:302021-04-17T04:36:24+5:30
लाहेरी : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम धोडराज ते इंदेवाडा या मार्गाची खड्ड्यांमुळे वाताहात झाली आहे. हा मार्ग पूर्णत: उखडला असल्याने ...

धोडराज-इंदेवाडा मार्गाची दुरुस्ती करा
लाहेरी : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम धोडराज ते इंदेवाडा या मार्गाची खड्ड्यांमुळे वाताहात झाली आहे. हा मार्ग पूर्णत: उखडला असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तालुका मुख्यालयाशी जोडण्याकरिता १९९८ मध्ये या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. या रस्त्यामुळे अतिदुर्गम भागातील गावांना मुख्य रस्त्याशी जोडण्याची मोठी सोय झाली. परंतु, देखभाल व दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले. मागील २० वर्षांच्या कालावधीत एकदाही या मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे डांबर पूर्णपणे निघून गेले आहे. गिट्टी बाहेर पडली आहे. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
माकडांचा हैदोस; पिकांचे नुकसान
वैरागड : जंगलात वास्तव्याला राहणाऱ्या माकडांनी मागील चार ते पाच वर्षांपासून लोकवस्तीकडे धाव घेणे सुरू केल्याने ग्रामीण भागातील कौलारू छपरांच्या जुन्या घरांचे आयुष्य कमी झाले आहे. माकडांच्या हैदोसामुळे गावखेड्यातील परसबागा ओस पडत आहे. मात्र, याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. वन्यजीव प्रगणनेत माकडांचा समावेश असल्याने माकडांना इजा होईल, अशी कृती करणे हा गुन्हा ठरत असतो. काळ्या तोंडाची माकडे ही अत्यंत चपळ वन्यजीव असल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जंगले ओस पडत असल्याने माकडांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळविला असून, घरासमोरील परसबाग व शेतातील लावलेल्या भाजीपाला पिकांची नासाडी करीत आहेत.
मिरचीविना परतले हजारो मजूर
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्याच्या कामासाठी गेले होते. कोरोना संचारबंदीच्या कालावधीत सरकारने निर्णय घेतल्याने हे मजूर जिल्ह्यात स्वगावी परतले. मात्र, दरवर्षीप्रमाणे त्यांनी सोबत वाळलेली लाल मिरची आणली नाही. संचारबंदीच्या काळात मजुरांच्या वाहतुकीची समस्या निर्माण झाल्याने शेवटच्या तोड्याची मिरची या मजुरांना आपल्या गावाकडे आणता आली नाही. परिणामी एक ते दीड महिना मिरची तोडणीचे काम करूनसुद्धा या मजुरांना आता बाजारातून मिरची घ्यावी लागणार आहे.
मोहफूल वेचणी हंगाम शेवटच्या टप्प्यात
गडचिरोली : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून मोहफूल पडण्यास सुरुवात होते. फेब्रुवारी, मार्च व एप्रिल असे तीन महिने व मे महिन्यांतील दोन आठवडे, अशा कालावधीत मोहफूल वेचणीचा हंगाम चालतो. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील मोहफूल वेचणी हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये पोते भरून वाळलेले मोहफूल भरून ठेवण्यात आले आहे. मोहफूल वेचणीच्या हंगामातून हजारो मजुरांना कोरोनाच्या संचारबंदीतही सकाळच्या सुमारास रोजगार प्राप्त झाला. आता हा रोजगार संपण्याच्या मार्गावर आहे.
सुरसुंडीजवळील ठेंगणा पूल अडवितो मार्ग
कुरखेडा : कुरखेडा-मुरुमगाव मार्गावरील सुरसुंडी-इरूपधोडरी गावादरम्यान असलेल्या नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात हा मार्ग ठप्प होत असतो. काही नागरिक जीव मुठीत घालून पुढचा प्रवास करतात. सुरसुंडी गावाजवळून भेदरी नदी वाहते. या नदीवर ठेंगणा पूल बांधण्यात आला आहे. पावसाळ्यात थोडेअधिक पाणी पडल्यानंतर पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. त्यामुळे वेळोवेळी वाहतूक ठप्प होत असते. कुरखेडा-मुरुमगाव मार्गावर सदर नदी आहे. पुलावरून वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर या मार्गावरची वाहतूक ठप्प होते. सुरसुंडी, इरूपधोडरीसह इतर गावे प्रभावित होते. या नदीवर उंच पूल बांधावा, अशी मागणी कायम आहे. मात्र, या मागणीकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
देसाईगंजातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
देसाईगंज : देसाईगंज शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी झाली आहे. खड्ड्यांचे प्रमाण अधिक असल्याने खड्डा चुकविणे वाहनधारकाला अशक्य झाले आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे खड्ड्यांचा आकार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्य मार्गासह अंतर्गत मार्गांवरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. नगर परिषद, तसेच बांधकाम विभागाने खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सौरदिवे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
चामोर्शी : वीज पुरवठा नसलेल्या दुर्गम गावांमध्ये सौरदिव्यांची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली. परंतु, या सौरदिव्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष आहे. काही ठिकाणच्या सौरदिव्यांच्या बॅटरीची चोरी झाली, तर काही ठिकाणी सौर प्लेट लंपास करण्यात आल्या आहेत. सौरदिवे बसविण्यासाठी शासनाने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. लखमापूर बोरी परिसरातील गावांमध्ये सौरदिवे दुर्लक्षित असून, सौरदिव्यांना झाडाझुडुपांचा व वेलींचा वेढा आहे. सोबतच बॅटऱ्या लंपास झाल्या आहेत. दिव्यांचे खांबही गंजलेले असल्याने धोका निर्माण झाला आहे.
टिल्लूपंप जप्तीची मोहीम सुरू करा
गडचिरोली : उन्हाळा असल्याने पाण्यासाठी टिल्लुपंपांचा वापर वाढला आहे. नगर परिषदेतर्फे टिल्लुपंपधारकांवर कारवाई केली जात नसल्याने त्यांची हिंमत वाढत चालली आहे. त्यामुळे टिल्लुपंपाची संख्याही वाढत आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेने टिल्लूपंप पकडण्याची मोहीम सुरू करावी, अशी मागणी आहे. अनेक कुटुंबाकडे पाणी साठवून ठेवण्यासाठीचे साहित्य उपलब्ध नसल्याने अशा कुटुंबीयांची अल्प पाणीपुरवठ्यामुळे मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे टिल्लूपंप जप्तीची मोहीम राबवावी, अशी मागणी आहे.
आमगावच्या हेमाडपंथी मंदिराचा विकास करा
आमगाव (म.) : तालुक्यापासून १० किमी अंतरावर असलेल्या आमगाव (म.) येथील हेमाडपंथी मंदिर जीर्ण व दुरवस्थेत आहे. मात्र, याकडे पुरातत्व विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. येथील देवालय ऋषीची मूर्ती, शिवपींड, नदी, अष्टविनायक, लक्ष्मी नारायण, शिवपार्वती शाईल, हत्ती, घोडे, हनुमान, महाकालीचे देवालय, खोदकामामध्ये सापडलेली नाणी, शिलालेख, टाकीच्या पायऱ्या आहेत. त्यामुळे या मंदिराचा विकास करावा, अशी मागणी होत आहे. चामोर्शी तालुक्यात आष्टी, चपराळा भाविकांचे श्रद्धांस्थान असलेली मंदिरे आहेत.
शहरात मोकाट डुकरांची संख्या वाढली
गडचिरोली : मागील वर्षी नगरपालिकेच्या वतीने डुकर पकडण्याची मोहीम पथकाद्वारे राबविण्यात आली होती. काही काळ मोकाट डुकरांच्या हैदाेसावर नियंत्रण मिळाले होते. परंतु आता ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक वॉर्डात मोकाट डुकरांचा हैदोस वाढला असल्याने डुकर पकडण्याची मोहीम पुन्हा राबवावी, अशी मागणी होत आहे. शहरातील विविध वॉर्डांत कळपाने लहान-मोठी डुकरे फिरत असतात. यामुळे लहान मुले, वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. अनेकदा ही डुकरे नागरिकांच्या अंगणात प्रवेश करून घाण पसरवीत असतात.
अल्पवयीन चालकांकडे पोलिसांचे दुर्लक्ष
गडचिरोली : शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन वाहनधारकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, याकडे परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना तपासत आहेत. पण खास अल्पवयीन चालकांकडे लक्ष केंद्रित केल्यास अनेकजण विनापरवाना वाहतूक करताना आढळतील. अशावेळी त्यांच्या पालकांवरही कारवाई होऊ शकते.
सर्पमित्रांना विमा कवच देण्याची मागणी
सिराेंचा : नागरिकांचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात सर्पमित्र स्वत:चे प्राण धोक्यात घालून सापांना सुरक्षित जंगलात सोडतात. पर्यावरण व वन्यजिवांचे संरक्षण करतात. त्यामुळे त्यांना विमा द्यावा.
ध्वनी प्रदूषणात वाढ
देसाईगंज : वाहनांवर कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी आहे. असे असतानाही काही तरुण मोठ्या प्रमाणात दुचाकीवर हॉर्न लावून वाजवितात. त्यामुळे अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महिलांची कुचंबणा
चामाेर्शी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही प्रवासी निवाऱ्याजवळ प्रसाधनगृह नसल्याने, तसेच ज्या ठिकाणी आहे तिथे सर्वत्र अस्वच्छता असल्याने महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने याकडे लक्ष द्यावे.
वाहतुकीची काेंडी
देसाईगंज : शहरातील वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेकजण आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावत असल्याने काही भागामध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच झाली. मार्ग काढताना नागरिक त्रस्त होत आहेत. ओव्हरलाेड वाहनांमुळे रहदारी विस्कळीत हाेत आहे.
निराधार प्रकरणांचा निपटारा करावा
आष्टी : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
नव्या वस्त्यात रस्ता द्या
कुरखेडा : शहराचा दिवसेंदिवस झपाट्याने विस्तार होत आहे. मात्र, शहरातील अनेक नवीन वस्त्या आजही अनेक सोयी-सुविधांपासून वंचित आहे. यात प्रामुख्याने रस्त्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या भागात रस्त्यांची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.
दुर्गम गावे दुर्लक्षित
भामरागड : तालुक्यातील गावांच्या विकासाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणाणी रस्ते, पाणी, वीज, आदी सुविधांपासून ही गावे वंचित आहे. विशेष म्हणजे, आजही गावात एसटीसुद्धा पोहोचली नाही. त्यामुळे किमान सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रवासी निवाऱ्यांचा प्रस्ताव तयार करा
आरमाेरी : बहुतांश मोठ्या गावांमध्ये बस जाते. पण, बस थांब्यावर प्रवासी निवारे नसल्याने नागरिकांचे हाल होतात. विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. त्यामुळे प्रस्ताव तयार करून निवारे बांधावे.
विटा व्यावसायिक धास्तावले
गडचिरोली : तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात विटा तयार करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मजुरांकरवी विटा तयार झाल्या असून, या विटांची भट्टी लावण्याच्या तयारीत पुरवठादार होते. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळी वातावरण व रिमझिम पाऊस होत असल्याने भट्टी लावण्याचे काम थांबविण्यात आले आहे. ढगाळी वातावरणामुळे विटा व्यावसायिक नुकसानीच्या भीतीने धास्तावले आहेत. जिल्ह्यात दरवर्षी विटांना मोठी मागणी असते.