पट्टेवाटपासाठी अट शिथिल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST2021-03-17T04:37:14+5:302021-03-17T04:37:14+5:30

गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल ...

Relax the condition for allotment | पट्टेवाटपासाठी अट शिथिल करा

पट्टेवाटपासाठी अट शिथिल करा

गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांमार्फतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, ७५ वर्षांची अट असल्याने अनेक दावे प्रलंबित आहेत.

रेगडी येथे बँंक शाखा सुरू करा

घोट : घोटपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी परिसरात २५ ते ३० गावांचा समावेश आहे, शिवाय येथे पोलीस मदत केंद्र, शासकीय आश्रमशाळा, धर्मराव हायस्कूल, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत.

अनेक वार्डातील नाल्यांची दुरवस्था

गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत, शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.

मोहलीचा मनाेरा ठरताेय कुचकामी

धानोरा : तालुक्यातील मोहली बीएसएनएलचा मनोरा आहे, परंतु त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दुधमाळा, गिरोला, गोडलवाही आदी ठिकाणी भ्रमणध्वनी मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्मशानभूमींची दुरवस्था वाढली

कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले असले, तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताही नाही.

मामीडीताेगूजवळ पूल बांधण्याची मागणी

झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामीडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.

भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा

चामोर्शी : तालुक्यातील भीवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरुस्त करण्यात यावी.

पुलाअभावी वाहतूक होते वारंवार प्रभावित

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यावर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच आवागमन करावे लागते. मात्र, या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा

गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार

गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने, सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत.

नागमाता मंदिराजवळ गतिरोधक निर्माण करा

आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

भामरागड तालुक्यात लाइनमनची पदे भरा

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाइनमन असणे गरजेचे असते, परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते, तसेच एका लाइनमनकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे त्यांना प्रत्येक गावी सारखाच वेळ देऊ शकत नाही.

नागाेबा देवस्थान दुर्लक्षित

गडचिरोली : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगावपासून दोन किमी अंतरावरील नागोबा देवस्थान व परिसराच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागोबा देवस्थानात दरवर्षी रथसप्तमीनिमित्त मोठी जत्रा भरते. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, येथे निवास, पाणी व इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते.

विश्रामगृहाची मागणी प्रलंबितच

कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. सदर विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. कोरची हे जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण आहे. या ठिकाणी विश्रामगृह बांधल्यास या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सोयीचे होणार आहे.

पर्यटनस्थळांचा विकास रखडला

कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध सौंदर्याने नटलेला आहे. या ठिकाणी अनेक पर्यटनस्थळे आहेत, पण त्या ठिकाणी अजूनपर्यंत सोईसुविधा नाहीत. या पर्यटनस्थळांचा विकास केल्यास पर्यटकांची गैरसोय होणार नाही. पर्यटनस्थळे असतानाही केवळ शासनाची मान्यता व निधी मिळत नसल्याने त्यांची वाताहत आहे.

याेजनांबाबत जनजागृतीचा अभाव

कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुका स्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.

गाळ उपशाअभावी नाल्या तुंबल्या

गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी जादा मजूर देण्याची मागणी आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी जमा झाले होते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला. सध्या नाल्या तुंबल्याने डांसाची पैदास वाढला आहे. त्यामुळे गाळाचा उपसा करावा, अशी मागणी हाेत आहे.

Web Title: Relax the condition for allotment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.