वीज नियमित मात्र कमी दाबाचा पुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST2021-02-05T08:48:20+5:302021-02-05T08:48:20+5:30
एकीकडे विद्युत विभाग अनेक ग्राहकांना अधिकचे वीज बिल पाठवित आहे तर आता कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड ...

वीज नियमित मात्र कमी दाबाचा पुरवठा सुरू
एकीकडे विद्युत विभाग अनेक ग्राहकांना अधिकचे वीज बिल पाठवित आहे तर आता कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. ग्राहकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, कूलर, पंखे, बल्ब निकामी होत असून विहिरींतील अर्धा एचपीची पाण्याची मोटरसुद्धा कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे कार्यान्वित हाेत नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, तालुक्यातील वीज ग्राहकांचे रिडिंग व बिल यामध्ये बराच फरक दिसून येत आहे. कृषी पंपासाठी नवीन वीज जोडणीकरिता अर्ज करूनही अनेक ग्राहकांना जाेडणी मिळाली नाही. कोरची वीज वितरण कंपनी कार्यालयातील काही कर्मचारी विविध कारणे सांगून वारंवार कार्यालयाच्या चकरा मारायला लावत आहेत. ग्राहकांना कागदपत्रांविषयी याेग्य माहिती दिली जात नाही. त्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावले जाते. तालुक्यातील अनियमित व कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याबाबत नागरिकांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली. परंतु काहीच उपयाेग झाला नाही. ४ ऑगस्ट २०२० ला तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरची-कुरखेडा राज्य महामार्गावर चक्काजाम आंदाेलन करून लक्ष वेधले हाेते. त्याप्रमाणे पुन्हा आंदाेलन करावे लागणार की काय, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
काेट
काेरची तालुक्यात कुरखेडावरूनच कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात आहे. वीज बिल कमी करण्याचे काम लिपिकाकडे साेपविले आहे. त्यांची कामे ते पाहतात. माझ्याकडे अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कारभार आहे. कृषिपंप व सौर ऊर्जा पंप तसेच संपूर्ण कार्यालयातील कामे कनिष्ठ अभियंता अरविंद सूर्यवंशी यांच्याकडे आहेत.
प्रफुल्ल कुरसंगे, अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता काेरची