केबल चालकांकडून करमणूक कराची चोरी

By Admin | Updated: February 3, 2015 22:56 IST2015-02-03T22:56:16+5:302015-02-03T22:56:16+5:30

जिल्ह्यातील केबलचालकांकडून मोठ्या प्रमाणात करमणूक कराची चोरी केली जात आहे. याबाबत करमणूक विभागाकडे अनेकवेळा तक्रारी करूनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने लाखो

Recreational tax evasion from cable operators | केबल चालकांकडून करमणूक कराची चोरी

केबल चालकांकडून करमणूक कराची चोरी

गडचिरोली : जिल्ह्यातील केबलचालकांकडून मोठ्या प्रमाणात करमणूक कराची चोरी केली जात आहे. याबाबत करमणूक विभागाकडे अनेकवेळा तक्रारी करूनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रूपयांच्या करणूक करापासून शासनाला मुकावे लागत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १३ हजार ५५२ केबल ग्राहक आहेत. तर ७१ केबल आॅपरेटर आहेत. नगर परिषद क्षेत्रातील प्रत्येक केबल कनेक्शनवर शासनाकडून ३० रूपये तर ग्रामीण भागातील केबल कनेक्शनवर १५ रूपये करमणूककर आकारले जाते. या कराच्या चार ते पाच पटीने केबल आॅपरेटर ग्राहकांकडून शुल्क वसूल करतात. शहरातील नागरिकांकडून जवळपास महिन्याचे १५० रूपये शुल्क आकारले जाते. यातील फक्त ३० रूपये शासनाकडे भरायचे असतानाही केबल ग्राहकांची संख्या कमी दाखवून केबल आॅपरेटर करमणूककराची चोरी करीत आहेत. यामुळे वर्षाकाठी शासनाला लाखो रूपयांचा चुना लागत आहे. केबलच्या संख्येची प्रत्यक्ष शहानिशा करण्याचे अधिकार तलाठ्यांना देण्यात आले आहेत. मात्र बरेचसे तलाठी याबाबतचा अहवाल घरबसल्या करमणूक विभागाला सादर करतात. करमणूक विभागामध्येही केवळ एकच कर्मचारी कार्यरत आहे. २०१२-१३ मध्ये ७० लाख, २०१३-१४ मध्ये ८३ लाख, एप्रिल ते डिसेंबर २०१४ पर्यंत ५४.८८ लाख रूपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. प्रशासनाकडून तपासणी मोहीम हाती घेतल्यास फार मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे. सेटआॅफ बॉक्स बसविण्यास गडचिरोली जिल्ह्याला मुदतवाढ दिल्याने करमणूककराची चोरी चालू राहणार आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Recreational tax evasion from cable operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.