गाेंडवानातील २५१ विद्यार्थ्यांची होणार पुन्हा परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:36 IST2021-04-17T04:36:44+5:302021-04-17T04:36:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : गाेंडवाना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा ५ एप्रिलपर्यंत घेण्यात आल्या. चंद्रपूर, गडचिराेली जिल्ह्यातील ...

गाेंडवानातील २५१ विद्यार्थ्यांची होणार पुन्हा परीक्षा
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गाेंडवाना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा ५ एप्रिलपर्यंत घेण्यात आल्या. चंद्रपूर, गडचिराेली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठातील कॅम्पस मिळून ७८ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. ३६० अभ्यासक्रमांच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत यशस्वीरित्या घेण्यात आल्या. मात्र, पेपर साेडविताना इंटरनेटचा स्पीड, हँग हाेणे व इतर तांत्रिक अडचणींमुळे २५१ विद्यार्थ्यांना एक किंवा दाेन पेपर देता आले नाहीत. या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. एप्रिल अखेरपर्यंत ही परीक्षा होणार आहे.
चंद्रपूर व गडचिराेली हे दाेन जिल्हे मिळून गाेंडवाना विद्यापीठाची एकूण २०५ महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठाअंतर्गत सुमारे ७८ हजार विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. ५ एप्रिलपर्यंत परीक्षा आटाेपण्यात आल्या असून, सर्व अभ्यासक्रमांचे निकाल टप्प्याटप्प्याने ११ एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना यूजर आयडी देण्यात आला असून, पीआरएल क्रमांक व आईचे नाव असलेले पासवर्ड टाकल्यावर संबंधित विद्यार्थ्याला निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
तांत्रिक अडचणीमुळे २५१ विद्यार्थ्यांचा प्रत्येकी एक, तर काही विद्यार्थ्यांचे दाेन पेपर अपूर्ण राहिले आहेत. या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले नसून, त्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
बाॅक्स..
व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा हाेणार
यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात एमबीए, एलएलबी, बीई, बीफाॅम व बीएड आदी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा विलंबाने झाली. त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या परीक्षा उशिरा हाेत आहेत. या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची पहिली सेमिस्टर परीक्षा एप्रिल महिन्यानंतर घेण्यात येणार आहे, अशी माहिती गाेंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव तथा परीक्षा मंडळाचे संचालक डाॅ. अनिल चिताडे यांनी दिली.