शिधाधारकांना आठ महिन्यांपासून साखरेची प्रतीक्षा; योजनेतून साखर बंद झाली का? लाभार्थ्यांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:32 IST2024-12-13T16:31:15+5:302024-12-13T16:32:14+5:30

रेशनवर मिळेना, विकत घेणे परवडेना : अंत्योदय लाभार्थ्यांच्या पदरी पडतेय निराशा

Ration holders have been waiting for sugar for eight months; Has sugar been discontinued from the scheme? Beneficiaries' question | शिधाधारकांना आठ महिन्यांपासून साखरेची प्रतीक्षा; योजनेतून साखर बंद झाली का? लाभार्थ्यांचा प्रश्न

Ration holders have been waiting for sugar for eight months; Has sugar been discontinued from the scheme? Beneficiaries' question

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
रेशन दुकानामार्फत अंत्योदय लाभार्थ्यांना शासनाकडून साखर उपलब्ध करून दिली जाते. मात्र, मागील आठ महिन्यांपासून शासनाने साखर दिली नाही. लाखो लाभार्थ्यांना शेकडो रुपयांचे रेशन अगदी मोफत वितरीत केले जात असताना एक किलो साखरेसाठी शासनाकडे निधी नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


पूर्वी शासनाकडून सर्वच लाभार्थ्यांना साखर दिली जात होती. मात्र, मागील जवळपास १० वर्षांपासून साखर देणे बंद केले आहे. केवळ अंत्योदय लाभार्थ्यांनाच साखर दिली जात आहे. त्यात मागील चार वर्षांपासून अनियमितता असल्याचे दिसून येते. चार ते पाच महिने साखर दिली जात नव्हती. आता मात्र सर्व रेकॉर्ड तुटले. तब्बल आठ महिन्यांपासून साखरेचे वितरण करण्यात आले नाही. अतिशय गरीब असलेल्या कुटुंबालाच अंत्योदय कार्ड दिला जाते. हे कार्ड देताना तहसीलदार शहानिशा करतात. त्यानंतरच कार्ड दिले जाते. त्यामुळे अंत्योदय लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती कशी असते, हे दिसून येते. शासनाने इतर लाभार्थ्यांची साखर बंद केली असली तरी अंत्योदय लाभार्थ्यांची साखर बंद केली नाही. मात्र, साखर नियमितपणे दिली जात नाही. 


गरिबांच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवत आहे. अंत्योदय लाभार्थ्यांना प्रतीकार्ड केवळ एक किलो साखर दिली जाते. ती नियमित देण्याची मागणी आहे.


रेशन दुकानदारांची चांदी 
पुरवठा विभागामार्फत साखरेचा नियमित पुरवठा केला जात नाही. काही वेळेला दोन ते तीन महिन्यांची साखर एकाचवेळी दिली जाते. याची माहिती अंत्योदय लाभार्थ्यांना राहत नाही. परिणामी तीन महिन्यांची साखर आल्यास दुकानदार दोन महिन्यांची साखर देतात. उर्वरित एका महिन्याची साखर हडपतात. दुर्गम व ग्रामीण भागातील दुकानदारांनी हा प्रकार सुरू केला आहे. यातून लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे. 


"मागील काही वर्षांपासून पुरवठा विभागाकडून अंत्योदयची साखर नियमित दिली जात नाही. यापूर्वी चार ते पाच महिन्यांसाठी साखरेचे वितरण थांबले होते. आता मात्र तब्बल आठ महिन्यांपासून साखर मिळाली नाही. लाभार्थ्यांनी प्रत्येकवेळी पॉस मशिनमधून निघणारी पावती तपासावी. त्यात संपूर्ण धान्याचा तपशील असतो." 
- रूपेश वलके, रेशन दुकानदार


पावती अवश्य बघावी
लाभार्थ्याला किती धान्य दिले जात आहे. याचा तपशील पॉस मशिनमधून निघणाऱ्या पावतीमध्ये असतो. मात्र, बरेच लाभार्थी ही पावती बघत नाहीत किंवा घरीही नेत नाहीत. परिणामी दुकानदारांचे फावत आहे. काही दुकानदार तर साखर बंद झाल्याचे नागरिकांना सांगत आहेत व पुरवठा विभागाकडून आलेली साखर परस्पर हडप करत आहेत.


अंत्योदय लाभार्थी 
तालुका                      शिधापत्रिका 

गडचिरोली                     ८,९८७ 
धानोरा                          १०,७४२ 
चामोर्शी                         १२,९४० 
मुलचेरा                         ५,३१५ 
देसाईगंज                       ४.४१५ 
आरमोरी                        ५,८२८ 
कुरखेडा                        ११,३५४ 
कोरची                           ४,८५८ 
अहेरी                           १२,३२५ 
एटापल्ली                     ९,८३४ 
भामरागड                     ५,६९० 
सिरोंचा                         ७,८६९ 
एकूण                         १,००,१५७

Web Title: Ration holders have been waiting for sugar for eight months; Has sugar been discontinued from the scheme? Beneficiaries' question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.