From the Raksha Bandhan, the students of Mumbai raised the morale of the soldiers | रक्षाबंधनातून मुंबईच्या विद्यार्थिनींनी जवानांचे मनोबल उंचावले
रक्षाबंधनातून मुंबईच्या विद्यार्थिनींनी जवानांचे मनोबल उंचावले

ठळक मुद्देअनोखा उपक्रम : शहीद जवानांच्या माता व पत्नींनी बांधल्या राख्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवाद्यांसोबत लढणाऱ्या गडचिरोलीच्या पोलीस जवानांचे मनोबल वाढावे, यासाठी मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी जवानांसाठी सुमारे ६ हजार ५०० राख्या पाठविल्या. गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या माता, पत्नी यांनी या राख्या रक्षाबंधनाच्या दिवशी पोलीस जवानांना बांधल्या.
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस जवानांना नक्षलवाद्यांचा सामना करण्याबरोबरच येथील विपरित नैसर्गिक परिस्थितीशी सुध्दा झूंज द्यावी लागते. त्यामुळे येथील नोकरी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या धोकादायक व कष्टप्रद आहे. अशाही परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस चांगले काम करीत आहेत. त्यामुळे येथील पोलीस जवानांबद्दल राज्यभरातील जनतेमध्ये आपुलकी आहे.
मुंबई येथील एसएनएडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, कुलसचिव डॉ. दीपक देशपांडे यांच्या मार्गदर्शनात समाजकार्य आणि आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या प्रमुख डॉ. आशा पाटील यांच्या नेतृत्वात ‘कृतज्ञता’ हा सामाजिक उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत अमेय महाजन, अक्षित बक्षी, पुनम गायकवाड, मुनीरा यांनी विद्यार्थिनींकडून ६ हजार ५०० राख्या बनवून घेतल्या. या राख्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस जवानांना पाठविल्या. त्याअनुषंगाने गडचिरोली पोलीस मुख्यालयात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन १५ आॅगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान शहीद पोलीस कर्मचाºयांच्या माता, पत्नीसह शालेय विद्यार्थिनींनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राख्या बांधल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग, अप्पर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थितीत होते.

Web Title: From the Raksha Bandhan, the students of Mumbai raised the morale of the soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.