अतुल बुराडे
विसोरा : मनोरंजसाठी गाणी ऐकणे, जगाची खबर जाणून घेण्यासाठी बातम्या ऐकणे यासाठी अर्धशतकापूर्वीच्या काळात रेडिओ हे एकमेव साधन होते. ज्यांच्याकडे रेडिओ आहे ते लोक श्रीमंत म्हणून गणल्या जात. अरण्यपट्ट्यात वसलेल्या देसाईगंज तालुक्यातील विसोरा या गावात आजही त्या काळातील रेडिओच्या आठवणी जाग्या करणाऱ्या व्यक्ती आहेत. आजपासून तब्बल ६० वर्षांपूर्वी १९६० मध्ये या गावातील प्रतिष्ठित नागरिक उद्धव परशुरामकर यांनी चंद्रपूर येथून रेडिओ विकत घेऊन आणला होता. या भागातील तो पहिला रेडिओ होता.
गावात माेेबाईल व टीव्ही ही साधने पाेहाेचण्यापूर्वी जनसंवादासाठी रेडिओ हे एकमेव दृकश्राव्य माध्यम हाेते. नागपूरच्या व्यक्तीने बाेललेला आवाज आपल्या घरात ऐकू येणे, हे एक कुतूहलच वाटत हाेते. त्यामुळे रेडिओवरील कार्यक्रम ऐकण्यासाठी दिवसभर परशुरामकर यांच्या घरी वर्दळ राहात हाेती. सन १९६० च्या दरम्यानचे रेडिओ बॅटरीवर चालणारे होते. त्यामुळे त्याला विजेची गरज पडत नव्हती.
या रेडिओवर नागपूर केंद्रावरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम ऐकले जात होते. विशेष बाब म्हणजे, तब्बल ६० वर्षांपूर्वी विसोरात जेव्हा पहिला रेडिओ आला, तेव्हा गावात वीजसुद्धा आलेली नव्हती. सन १९६४ ला विसोरात वीज पाेहाेचली. रेडिओ दाखल झाले, त्यावेळी गावामध्ये टीव्हीचा पत्ता नव्हता. म्हणजेच परशुरामकर यांनी आणलेला रेडिओ विसोरातले पहिलावहिले प्रसारमाध्यम होते. त्यामुळे रेडिओची प्रचंड क्रेझ होती. गावामध्ये रेडिओ ऐकण्यास सकाळपासून वीस-पंचवीस लोकांची सतत गर्दी असायची. त्यानंतर, फिलिप्स, मर्फी, नेल्को या कंपनींचे रेडिओ विसोरा येथे आणल्या गेले. रेडिओ आगमनाच्या पूर्वी गावातील कुणी शहराच्या ठिकाणी शिकत असेल वा जात असेल, तो व्यक्ती गावात आल्यावर वाचून-ऐकून देशातील, जगातील घटनांची माहिती देत असे. तेव्हा रेडिओच्या बॉक्समधून आवाज ऐकू येणे हे आश्चर्यच होते. म्हणूनच रेडिओ ऐकण्यास लोकांची गर्दी व्हायची. विसोरा येथील काही धनाढ्य लोक नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा अशा शहरांत नेहमी जात, त्यामुळे त्यांना बाजारात येणाऱ्या नवनव्या वस्तूंची माहिती व्हायची आणि ते खरेदी करीत.
बाॅक्स
टीव्ही, माेबाइलने घेतली रेडिओची जागा
२० वर्षांपूर्वी ग्रामीण भागात माेबाइल पाेहाेचला नव्हता, तर टीव्ही घेणे सर्वसाधारण व्यक्तीला परवडत नव्हते, तसेच गावात असलेली टीव्ही अँटिनावर चालविली जात असल्याने, या टीव्हीवर दूरदर्शन हा एकच चॅनल दिसत हाेता. त्यामुळे टीव्ही बघायसाठीही कंटाळा येत हाेेता. परिणामी, सर्वसामान्य व्यक्ती रेडिओच खरेदी करीत हाेेता. मात्र, डीटीएच सेवा ग्रामीण भागात उपलब्ध झाल्यानंतर अनेक चॅनल दिसायला लागले, तसेच टीव्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा हाेऊन टीव्हीच्या किमती सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्यात आल्याने नागरिक टीव्ही खरेदी करायला लागले. त्यानंतर, आलेल्या स्मार्ट माेबाइलवर साेशल मीडियाचा विस्तार हाेऊन नागरिक रेडिओला विसरण्यास सुरुवात झाले आहेत.