कठाणीच्या पुलाचा प्रश्न लागणार मार्गी
By Admin | Updated: January 22, 2015 01:06 IST2015-01-22T01:06:33+5:302015-01-22T01:06:33+5:30
गडचिरोली शहरालगत असलेला कठाणी नदीचा ठेंगणा पूल उंच करण्याचे काम आता पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. या कामासाठी नवा कंत्राटदार ...

कठाणीच्या पुलाचा प्रश्न लागणार मार्गी
गडचिरोली : गडचिरोली शहरालगत असलेला कठाणी नदीचा ठेंगणा पूल उंच करण्याचे काम आता पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. या कामासाठी नवा कंत्राटदार न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर मिळाला असून त्यांना काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले असल्याची माहिती आहे.
दोन वर्षांपूर्वी सलग सात दिवस वाहतूक बंद राहिल्याचीही घटना घडली. यानंतर जनआक्रोश वाढला. तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील व तत्कालीन आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोली शहरालगतच्या कठाणी नदीचा पूल उंच करण्याच्या कामाला प्राधान्य दिले. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू केली. या कामासाठी १५ कोटी रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला. सुरूवातीला या पुलाचे काम पुणे येथील घारापुरे कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र निविदा प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पार पडून आता या पुलाचे काम खरे अॅन्ड तारकुंडे कंपनीला देण्यात आले आहे, अशी माहिती आहे. यासाठी फेर निविदा काढण्यात आली व हे काम त्यांना मिळाले. आता पुन्हा नव्याने भूजल बोअर करण्याचे काम नव्या कंत्राटदाराकडून या भागात सुरू करण्यात आले आहे. पहिल्या कंत्राटदाराने नोव्हेंबर महिन्यात येथे काम सुरू केले होते व न्यायालयीन प्रक्रियेनंतर ते थांबविले होते. आता पुन्हा काम सुरू झाले आहे. हा पूल उंच झाल्याने गडचिरोलीकरांना मोठा दिलासा पावसाळ्याच्या दिवसात मिळणार आहे.