कंपनीवर अॅट्रॉसिटी लावा
By Admin | Updated: April 14, 2016 01:42 IST2016-04-14T01:42:18+5:302016-04-14T01:42:18+5:30
आदिवासी जनतेला कुठलीही माहिती न देता व विश्वासात न घेता त्यांची दिशाभूल करून सूरजागड पहाडीवरून

कंपनीवर अॅट्रॉसिटी लावा
धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी : एटापल्लीत पं. स. मध्ये काँग्रेस, राकाँची बैठक
एटापल्ली : आदिवासी जनतेला कुठलीही माहिती न देता व विश्वासात न घेता त्यांची दिशाभूल करून सूरजागड पहाडीवरून मोठ्या प्रमाणावर लोहखनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या कंपनीवर अॅट्रॉसिटी लावावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी एटापल्ली येथे केली.
सूरजागड लोह प्रकल्प एटापल्ली तालुक्यातच व्हावा, यावर विचारमंथन करण्याकरिता स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिकांची संयुक्त बैठक बुधवारी घेण्यात आली. यावेळी माजी आ. पेंटारामा तलांडी, प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव सगुणा तलांडी, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, संतोष आत्राम, बबलू हकीम, पं. स. उपसभापती संजय चरडुके, आदिवासी विकास महामंडळाचे माजी संचालक सैनूजी गोटा, मुक्तेश्वर गावडे, लालसू नरोटी, चंद्रकांत बेझलवार, ऋषी पोरतेट, रियाज शेख उपस्थित होते.
सूरजागड पहाडीवरून लोहखनिज उत्खनन करून बाहेर वाहतूक केली जात असल्याबाबत सभेत शासनावर टीका करण्यात आली. लोहखनिज उत्खनन करणारी कंपनी व शासनाने पेसा कायद्याचे उल्लंघन करून लोहखनिज उत्खननाचे काम सुरू केले आहे, असे सैनूजी गोटा यांनी सांगितले. यावेळी सगुणा तलांडी यांनीही शासनाच्या ध्येय धोरणावर जोरदार टीका केली. सूरजागड लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यातच व्हावा, प्रकल्प बाहेर हलवू नये, याकरिता सर्वांनी तीव्र लढा उभारावा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांच्या वतीने सभेत करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
२० ला काढणार मोर्चा
सूरजागड लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यातच निर्माण करावा, प्रकल्प बाहेर हलवू नये, या मागणीसाठी २० एप्रिल रोजी एटापल्ली येथील उपविभागीय कार्यालयावर सर्व पक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. एटापल्ली तालुक्यातील गोरगरीब आदिवासी, गैरआदिवासी, बेरोजगारांनी एकजूट होऊन या मोर्चात सहभागी व्हावे, व सूरजागड लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यात निर्माण व्हावा, या मागणीसाठी संघर्ष करावा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांच्या सभेत करण्यात आले.