सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:35 IST2021-04-15T04:35:00+5:302021-04-15T04:35:00+5:30
धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वनविभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सुबाभूळ लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या ...

सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या
धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वनविभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सुबाभूळ लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.
टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव
धानोरा : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.
तोट्यांअभावी वाया जाते हजारो लिटर पाणी
गडचिरोली : शहरातील अनेक नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत. तोटी नसल्यास संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
खोब्रागडी नदीपुलावर कठड्यांचा अभाव
मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा गावाजवळून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीवर १० वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी या पुलावर लोखंडी संरक्षण कठडे लावण्यात आले होते. मात्र काही महिन्यातच हे संरक्षण कठडे यंत्रणेने काढले. तेव्हापासून या पुलावर संरक्षण कठडे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता आहे.
शहरातील रस्त्यावर बांधकाम साहित्य
गडचिरोली : शहरात विविध भागांत घराचे बांधकाम सुरू असून बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळ्या तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळ्या आदी साहित्यही ठेवले आहे. मात्र याकडे न.प.चे दुर्लक्ष आहे. साहित्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघातही वाढले आहेत.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
आष्टी : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. रात्रीच्या सुमारास या मोकाट जनावरांमुळे अपघात वाढले आहेत.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. बहुतांश स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते पांदण रस्ते आहेत. या रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे.
डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वाॅर्डांत डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकरांच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
बसस्थानकातील पोलीस चौकी सुरू करा
गडचिरोली : महामंडळाचे गडचिरोली आगार व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली बसस्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली होती. मात्र या पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नाही. अनेकदा सदर पोलीस चौकी कुलूपबंद दिसून येते.
झेलिया गावाला रस्ता कधी मिळणार?
धानोरा : धानोरा या तालुका मुख्यालयापासून ४१ किमी अंतरावर असलेल्या कटेझरी ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या लहान झेलिया या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे जंगलातून पायवाट तुडवत गाव गाठावे लागते. गावाला जातेवेळी दोन मोठमोठे नाले पडतात. पावसाळ्यात या नाल्यांमध्ये पाणी राहत असल्याने रहदारी पूर्णपणे ठप्प होते. हे गाव कटेझरीपासून पाच किमी अंतरावर आहे. मुरूमगाव-कटेझरीपर्यंत डांबरी रस्ता आहे. मात्र त्यानंतर रस्त्याचा अभाव आहे.
शाळांमध्ये शौचालयांचा अभाव
गडचिरोली : केंद्र शासनाने प्रत्येक शाळेत शौचालय असणे बंधनकारक करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शौचालय नाही. काही शाळांनी शौचालयाचे बांधकाम सुरू असून ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शौचासाठी बाहेर जावे लागत आहे. सर्व शाळांमध्ये शाैचालय आणि पाण्याची पुरेशी सुविधा देण्याची गरज आहे.
बनावट मापांमुळे ग्राहकांची फसवणूक
गडचिरोली : ग्रामीण भागातील आठवडी बाजार व अन्य ठिकाणी गावोगावी जाऊन खासगी धान्य व इतर वस्तूंची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मापातील त्रुटीमुळे सामान्य शेतकऱ्यांच्या धान्याची व किरकोळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे.
ग्रामीण भागात व्यायामशाळेची मागणी
गडचिरोली : ग्रामीण भागातील अनेक होतकरू तरुण आहेत. मात्र त्यांना अपुऱ्या सोयी-सुविधा मिळत असल्याने ते पुढे जाऊ शकत नाही. सैनिक भरती तसेच इतर भरतीसाठी ग्रामीण भागातील तरुणांना व्यायामशाळेअभावी इतरत्र कसरत करावी लागत असल्याने आधुनिक सोयी-सुविधेपासून वंचित आहेत.
‘नो पार्किंग’चे फलक नावापुरतेच
गडचिरोली : शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘नो-पार्किंग’चे फलक लावले जातात. मात्र नेमका याच फलकासमोर दुचाकी वाहने लावली जातात. हे नियम सामान्य नागरिकांबरोबरच कार्यालयातील कर्मचारीसुद्धा पाळत नाही. त्यामुळे नो-पार्किंगच्या फलकासमोरच दुचाकी वाहने उभी असल्याचे प्रत्येक कार्यालयात दिसून येते.