गडचिराेली बस आगारात नियमित इंधन पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:36 IST2021-03-26T04:36:54+5:302021-03-26T04:36:54+5:30
गडचिराेली : स्थानिक गडचिराेली बस आगारात डिझेलचा पुरवठा अनियमित केला जात आहे. त्यामुळे बसेसचे वेळापत्रक बिघडत असल्याने विद्यार्थी, प्रवाशी ...

गडचिराेली बस आगारात नियमित इंधन पुरवठा करा
गडचिराेली : स्थानिक गडचिराेली बस आगारात डिझेलचा पुरवठा अनियमित केला जात आहे. त्यामुळे बसेसचे वेळापत्रक बिघडत असल्याने विद्यार्थी, प्रवाशी यांना बसस्थानकावर ताटकळत राहावे लागत आहे. मध्यवर्ती कार्यालयाने डिझेलचा नियमित पुरवठा हाेईल, या उद्देशाने नियाेजन करावे, अशी मागणी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील दाेन महिन्यांपासून गडचिराेली आगारामध्ये नियतानुसार बसेस चालविण्याकरिता पुरेसा डिझेल पुरवठा केला जात नाही. आगारात डिझेल राहत नसल्यामुळे बसेस साेडण्यास उशीर हाेते, तर काही बसफेऱ्या रद्द कराव्या लागतात. ऐन वेळेवर बसफेरी रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसाेय हाेते. याचा सर्व दाेष एसटी कर्मचाऱ्यांना दिला जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थी, प्रवाशी बसची वाट पाहत बसथांब्यावर थांबून राहतात. मात्र बस पाेहाेचत नसल्याने रात्री उशिरापर्यंत बसथांब्यावरच प्रतीक्षा करावी लागते, तर बस रद्द झाल्यास पायी गाव गाठावे लागते. हा प्रकार वाढत चालला आहे. आगारात डिझेल नसणे हे एकमेव कारण आहे. त्यामुळे पुरेशा डिझेलचा पुरवठा करावा, अशी मागणी कास्ट्राईब संघटनेचे विभागीय सचिव दीपक मांडवे यांनी केली आहे. विभाग नियंत्रक कार्यालयामार्फत महाव्यवस्थापकांना पत्र पाठविण्यात आले आहे.