शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवा
By Admin | Updated: November 19, 2016 01:55 IST2016-11-19T01:55:15+5:302016-11-19T01:55:15+5:30
शासनाच्या मार्फतीने सुरू करण्यात आलेल्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने शेतकरी या ठिकाणी धान विक्रीस आणतात.

शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवा
उपसचिवांचे निर्देश : देलनवाडी येथील धान खरेदी केंद्राला भेट
वैरागड : शासनाच्या मार्फतीने सुरू करण्यात आलेल्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने शेतकरी या ठिकाणी धान विक्रीस आणतात. शेतकऱ्यांना धान विक्री केंद्रावर आवश्यक त्या सोयीसुविधा पुरावाव्या. धानाचे चुकारे तत्काळ होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेने गतीने काम करावे, असे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सतीश सुपे यांनी दिले.
वैरागड परिसरातील देलनवाडी येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या धान खरेदी केंद्राला उपसचिव सतीश सुपे यांनी भेट दिली. याप्रसंगी उपस्थित आदिवासी विविध कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी पुरवठा विभागाचे उपायुक्त आळे, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदूरकर, प्रादेशिक व्यवस्थापक गांगुर्डे, डहारे, देलनवाडीचे सरपंच माणिक पेंदाम, संस्थेचे सचिव रत्नाकर धाईत, रामहरी चौधरी, भगवान मडकाम, जोगीराम नरोटे, व्यंकटराव चौधरी, मनोज रणदिवे, व्यवस्थापक भाऊराव गोडमारे, केंद्र प्रमुख दिलीप कुमरे, केशव हिचामी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी धान खरेदी करण्याची प्रती हेक्टरी मर्यादा वाढवावी, तलाठी संपामुळे सातबारा मिळण्यास अडचण जात आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या मार्फत सातबारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सतीश सुपे यांच्याकडे केली. (वार्ताहर)