एपीएल कार्डधारकांना तत्काळ अन्नधान्याचा पुरवठा करा
By Admin | Updated: June 28, 2014 23:34 IST2014-06-28T23:34:52+5:302014-06-28T23:34:52+5:30
जिल्ह्यात सरकारी स्वस्त धान्य दुकानातून वितरीत केले जाणारे एपीएलचे धान्य गेल्या ४ महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना मिळाले नाही. तसेच अनेक कार्डधारकांना केरोसिनचेही वाटप अत्यंत कमी

एपीएल कार्डधारकांना तत्काळ अन्नधान्याचा पुरवठा करा
चुरमुरा : जिल्ह्यात सरकारी स्वस्त धान्य दुकानातून वितरीत केले जाणारे एपीएलचे धान्य गेल्या ४ महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना मिळाले नाही. तसेच अनेक कार्डधारकांना केरोसिनचेही वाटप अत्यंत कमी प्रमाणात करण्यात येत आहे, अशी तक्रार आ. आनंदराव गेडाम यांच्याकडे ग्राहकांनी केली. आ. गेडाम यांनी पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपुर यांच्याशी चर्चा करून एपीएल कार्डधारकांना त्वरित धान्य उपलब्ध करावे, अशी मागणी केली आहे.
जिल्ह्यात एपीएलकार्डधारकांची संख्या ३६ हजारच्यावर आहे. एपीएल कार्डधारक लाभार्थ्यांना मार्च २०१४ पासून गहू व तांदळाचे स्वस्त धान्य दुकानातून वितरण करण्यात आले नाही. तसेच अनेक कार्डधारकांना केरोसीनही मिळत नसल्याच्या तक्रारी आ. आनंदराव गेडाम यांच्याकडे काशिनाथ पोटफोटे, बेबी सोरते, तुळशीराम काशीकर, दत्तु सोमनकर आदी नागरिकांनी केली होती. याबाबत आ. गेडाम यांनी चौकशी केली असता केंद्र शासनाच्या स्तरावरून मंजूर नियतनप्रमाणे धान्यसाठा वितरीत झाला असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. आ. गेडाम यांनी राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपुर यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एपीएल अंतर्गत धान्य तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.
केंद्र सरकार रॉकेलचा कोठा मंजूर नियतनापेक्षा ३४ टक्केच महाराष्ट्राला पुरवठा करीत असल्याने कार्डधारकांना कमी केरोसिन मिळत आहे, अशी माहिती सचिव दीपक कपूर यांनी आ. गेडाम यांना दिली. जिल्ह्यातील एपीएल कार्डधारकांना दहा ते पंधरा दिवसांच्यात आत आवश्यक ते अन्नधान्य देण्यात येईल, असे आश्वासन पुरवठा विभागाच्या सचिवांनी आ. गेडाम यांना दिले आहे. जिल्ह्यातील एपीएल कार्डधारकांना गहू व तांदळाचा पुरवठा केला जाणार असल्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून एपीएल कार्डधारकांचा अन्नधान्य पुरवठा बंद करण्यात आला होता. (वार्ताहर)