एपीएल कार्डधारकांना धान्य द्या
By Admin | Updated: May 11, 2014 00:19 IST2014-05-11T00:19:17+5:302014-05-11T00:19:17+5:30
केंद्र सरकारने गरिबांना स्वस्त धान्य देण्यासाठी अन्न सुरक्षा योजना अंमलात आणली. मात्र या अन्नसुरक्षा योजनेमुळे प्रत्येक बिपीएल कार्डधारकांना मिळणारे ....

एपीएल कार्डधारकांना धान्य द्या
आरमोरी : केंद्र सरकारने गरिबांना स्वस्त धान्य देण्यासाठी अन्न सुरक्षा योजना अंमलात आणली. मात्र या अन्नसुरक्षा योजनेमुळे प्रत्येक बिपीएल कार्डधारकांना मिळणारे धान्य पूर्वीपेक्षा कमी झाले. त्यामुळे सदर योजनेची अंमलबजावणी करून शासनाने गरिबांची थट्टा केली आहे. आरमोरी तालुक्यात मागील ३ महिन्यापासून एपीएल (केशरी) कार्डधारकांना गहू, तांदळाचा पुरवठा करणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आरमोरी येथील एपीएल धारकांवर अन्याय होत आहे. एपीएलधारकांना गहू, तांदळाचा पुरवठा पूर्वीप्रमाणे करण्यात यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव डॉ. महेश कोपूलवार यांनी दिला आहे. शासनाने अन्नसुरक्षेचा कायदा अंमलात आणला. मात्र यात काही निवडक एपीएलकार्डधारकांना समाविष्ट करण्यात आले. तर काही कार्डधारक सधन असल्याचे कारण दाखवून एपीएलकार्डधारकांना एपीएलच ठेवण्यात आले. मात्र या एपीएल कार्डधारकांमध्ये अनेक कुटुंब सामान्य असून हलाखीचे जीवन जगत आहेत. आरमोरी तालुक्यातील अनेक एपीएलकार्डधारकांंना केला जाणारा गहू व तांदळाचा पुरवठा मागील ३ महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील एपीएल कार्डधारकांवर अन्याय झाला आहे. परिणामी अनेक कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. ज्या कुटुंबांकडे एपीएलचे कार्ड आहे, असे कुटुंब अजुनही हलाखीचे जीवन जगत असल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप कोपुलवार यांनी केला आहे. एपीएल व बीपीएल असा भेदभाव न ठेवता सरसकट सर्वांना २ रूपये गहू व ३ रूपये किलो तांदूळ असा पुरवठा करावा, प्रत्येक महिन्याला प्रत्येक कुटुंबाला ३५ किलो धान्य द्यावे, शासन प्रती व्यक्ती ४ किलो धान्य देत असल्याने एवढ्याच्या धान्यात कुटुंबाचे भरणपोषण करणे कठीण होत चालले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात जितडेतिकडे कमी धान्य मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. बीपीएल कार्डधारकांना मिळणारे कमी धान्य व एपीएल कार्डधारकांना ३ महिन्यापासून धान्य न मिळाल्याने स्वस्त धान्य दुकानदारही दुकानात येणार्या कमी धान्याच्या पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. एपीएल कार्डधारकांना ३ महिन्यापासून बंद करण्यात आलेला धान्य पुरवठ्याकडे प्रशासनाने लक्ष देऊन एपीएल कार्डधारकांना मिळणारे धान्य पूर्ववत करावे, अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाकपचे जिल्हासचिव डॉ. महेश कोपूलवार, जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार, विनोद झोडगे, देवराव चवळे यांनी दिला आहे.