उत्पादन घटले; मिरची उत्पादक चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 05:00 IST2022-02-27T05:00:00+5:302022-02-27T05:00:35+5:30
मिरची लागवडीसाठी माेठा खर्च आला. मात्र त्या मानाने भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. मिरची ताेडणीचा पहिला टप्पा आटाेपला आहे. पहिल्या ताेड्याची मिरची तेलंगणा राज्याच्या वारंगल येथील बाजारपेठेत नेऊन शेतकरी विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता दुसऱ्या टप्प्याचीही ताेडणी सुरू झाली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिरची माेठ्याप्रमाणात हातात येते.

उत्पादन घटले; मिरची उत्पादक चिंताग्रस्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
सिराेंचा : गतवर्षी काेराेना प्रादुर्भावाच्या संकटामुळे मिरचीच्या खरेदी-विक्री व्यवहाराला व्यापाऱ्यांच्या उदासीनतेमुळे चांगले दिवस आले नाहीत. यावर्षी चांगल्या उत्पादनाची अपेक्षा हाेती. मात्र दिवाळीनंतर अनेकदा पडलेल्या अवकाळी पावसाने मिरची पिकाला फटका बसला. परिणामी यावर्षी व्यापाऱ्यांकडून मिरचीला चांगला भाव मिळत नसल्याने सिराेंचा तालुक्यासह जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.
सिराेंचा तालुक्यासह अहेरी उपविभागात अनेक शेतकरी मिरची पिकाची लागवड करतात. या भागातील वातावरण व जमीन मिरची पिकाला पाेषक आहे. त्यामुळे मिरचीच्या लागवडीचे क्षेत्र दरवर्षी वाढत असते. गतवर्षी काेराेना संकटामुळे वाहतुकीची माेठी समस्या हाेती. उत्पादित मिरचीला दूरवरच्या व्यापाऱ्यांकडे नेणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. परिणामी व्यापाऱ्यानेच पुढाकार घेतल्याने मिरचीला चांगला भाव मिळाला नाही. यावर्षी भरघाेस उत्पादन व चांगल्या भावाची अपेक्षा मिरची उत्पादक शेतकऱ्यांना हाेती. मात्र वातावरणाच्या बदलामुळे ही आशा फाेल ठरली.
मिरची लागवडीसाठी माेठा खर्च आला. मात्र त्या मानाने भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. मिरची ताेडणीचा पहिला टप्पा आटाेपला आहे. पहिल्या ताेड्याची मिरची तेलंगणा राज्याच्या वारंगल येथील बाजारपेठेत नेऊन शेतकरी विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता दुसऱ्या टप्प्याचीही ताेडणी सुरू झाली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिरची माेठ्याप्रमाणात हातात येते. यावरच उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असते. तिसऱ्या टप्प्यात अधिक मिरची मिळत नसल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे.
क्विंटलमागे २० हजार रुपये भाव
- पहिल्या टप्प्यात ताेडणी झालेल्या मिरचीला प्रति क्विंटल १८ हजार ते २१ हजार रुपये असा भाव सुरू आहे. एक क्विंटल मिरची पिकविण्यासाठी बराच खर्च येताे. मिरची उत्पादकाला क्विंटलमागे २४ ते २५ हजार रुपये भावाची अपेक्षा हाेती. काही व्यापारी १६ हजार ५०० ते १८ हजार रुपये क्विंटलनुसार मिरचीची खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांना अल्प भाव मिळत असल्याने त्यांचे नुकसान हाेत आहे.
विदेशात निर्यात
सिराेंचा भागात उत्पादित चांगल्या प्रतीच्या मिरचीची म्यानमार व श्रीलंका या देशात निर्यात केली जाते. व्यापारी शेतकऱ्यांकडून अल्प भावाने खरेदी करून त्याची निर्यात जिल्ह्याच्या बाहेर राज्यात व देशात करतात. सध्या सिराेंचा भागात मिरची ताेडणीच्या कामाला वेग आला आहे.
२३० वर दर पाेहाेचला
गडचिराेली शहराच्या बाजारात व्यापाऱ्यांकडून लाल मिरची विक्रीसाठी आणली जाते. सध्या चांगल्या दर्जाची मिरची २३० ते २४० रुपये किलाे दराने विकली जात आहे. हलक्या दर्जाची मिरची १५० ते १६० रुपये किलाे दराने विकली जात आहे. यंदा भाव वधारले आहे.