आष्टी तालुक्याची निर्मिती करणार
By Admin | Updated: January 28, 2015 23:33 IST2015-01-28T23:33:08+5:302015-01-28T23:33:08+5:30
गडचिरोली जिल्ह्यात तालुका-तालुक्याचे अंतर अधिक आहे. त्यामुळे विकासात अपेक्षित गती नाही. आष्टी भागाचा गतीने विकास होण्यासाठी आष्टी तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार,

आष्टी तालुक्याची निर्मिती करणार
आष्टी येथे बैठक : राजकुमार बडोले यांचे आश्वासन
आष्टी : गडचिरोली जिल्ह्यात तालुका-तालुक्याचे अंतर अधिक आहे. त्यामुळे विकासात अपेक्षित गती नाही. आष्टी भागाचा गतीने विकास होण्यासाठी आष्टी तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
बुधवारी आष्टी येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे पूर्व विदर्भ संघटन मंत्री आशिष वांदिले, प्रकाश गेडाम, जि. प. सदस्य धर्मप्रकाश कोकुडकर, प्रभूदास खोब्रागडे, दिवाकर कुंदोजवार, अनंत प्रधान, अनिल आल्लुरवार, बंडू कुंदोजवार, विठ्ठल आवारी, राजू ऐडलावार, प्रकाश बोबाटे, भगवान धोटे आदी उपस्थित होते. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात टप्प्या-टप्प्याने स्वतंत्र जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार, असेही बडोले यांनी या बैठकीत सांगितले. याप्रसंगी ना. बडोले यांना भाजपचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात आष्टी तालुक्याची निर्मिती करावी, आष्टी गावात बसस्थानक उभारण्यात यावे, पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात यावी, एमआयडीसी उभारण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी जि. प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर यांच्या हस्ते सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीदरम्यान ना. बडोले यांनी आष्टी भागातील व गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांवर उपस्थित कार्यकर्त्यांशी चर्चा केली. (वार्ताहर)