कारागृहबंदींनी शेतीतून घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:30 IST2018-03-22T22:30:08+5:302018-03-22T22:30:08+5:30
कारागृह म्हणजे शिक्षा भोगण्याचे ठिकाण. बंदीस्त कोठडी, रूक्ष वातावरण आणि त्यात अंगमेहनतीची कामे करावी लागतात असाच सर्वसाधारण समज असतो.

कारागृहबंदींनी शेतीतून घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : कारागृह म्हणजे शिक्षा भोगण्याचे ठिकाण. बंदीस्त कोठडी, रूक्ष वातावरण आणि त्यात अंगमेहनतीची कामे करावी लागतात असाच सर्वसाधारण समज असतो. पण गडचिरोलीच्या खुल्या कारागृहात वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. खुनाच्या गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत असलेल्या या कारागृहातील बंदींनी उपलब्ध असलेल्या मोजक्या जागेवर शेती फुलविली. त्यात लावलेल्या भाजीपाला पिकातून गेल्या ११ महिन्यात साडेचार लाखांचे उत्पन्न घेतले आहे.
अनेक वर्षेपर्यंत कारागृहात राहिलेल्या बंदींंना शिक्षा संपल्यानंतर समाजात चांगले जीवन जगता यावे यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्याचच एक भाग म्हणून कारागृह प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी शेती करण्याचा निर्णय घेतला. कारागृहाच्या १७.५५ हेक्टर जागेपैकी इमारत, अंतर्गत रस्ते यात ३० टक्केपेक्षा जास्त भाग व्यापला गेला आहे. उर्वरित जागेवर फुलविताना जमिनीची मशागत करण्यासाठी पाहीजे ती साधनं नव्हती. शेजारच्या शेतकऱ्याला विनंती केल्यानंतर त्याने कोणताही मोबदला न घेता आपला ट्रॅक्टर देऊन पाहीजे ती मदत केली. कारागृहातील बंदीही स्वत:च्या शेतीप्रमाणे मेहनत घेऊन कामे करतात.
मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे गेल्या एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीत टमाटे, कोबी, वांगी, पालक, सांबार, मेथी, चवळी आणि तूर असे पीक घेण्यात आले. आतापर्यंतच्या भाजीपाला पिकातून ४ लाख ११ हजार ९६५ रुपयांचे उत्पन्न झाले. १३ क्विंटल तूर अद्याप शिल्लक असून तिला पकडून उत्पन्नाचा आकडा साडेचार लाखांच्या घरात जातो. पण ती तूर प्रत्यक्ष विकली जाणार नसून डाळ बनवून वर्षभरात कारागृहासाठी आवश्यक तेवढी डाळ ठेवून बाकी डाळ इतर ठिकाणच्या कारागृहाला पाठविणार असल्याचे कारागृहाचे निरीक्षक बी.सी.निमगडे यांनी सांगितले.
प्रभारी अधीक्षक डी.एस.आडे यांच्या मार्गदर्शनात कारागृहाच्या शेतीत विविध पिक घेण्याचे प्रयोग केले जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकºयांनी खरीप हंगामातील धानाचे पीक निघाल्यानंतर भाजीपाला लागवड केल्यास त्यांच्या उत्पन्नात बरीच भर पडू शकते असे त्यांनी स्वानुभवातून सांगितले.