सत्ताधाऱ्यांसमोर नगर पंचायत निवडणुकीचे तगडे आव्हान
By Admin | Updated: October 28, 2015 01:44 IST2015-10-28T01:44:41+5:302015-10-28T01:44:41+5:30
पहिल्या टप्प्यात सहा नगर पंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. चार दिवसानंतर येथे मतदान होणार आहे.

सत्ताधाऱ्यांसमोर नगर पंचायत निवडणुकीचे तगडे आव्हान
गडचिरोली : पहिल्या टप्प्यात सहा नगर पंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. चार दिवसानंतर येथे मतदान होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप-शिवसेनेची कसोटी लागणार असून भाजपच्या पुलाखालून वर्षभरात किती पाणी वाहून गेले, याचाही अंदाज या निवडणूक निकालावरून येणार आहे.
अहेरी उपविभागात भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा या पाच तालुक्यात तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रात चामोर्शी येथे पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. चामोर्शी हे जिल्ह्यातील मोठे गाव आहे. त्यामुळे नगर पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी चांगली कंबर कसली आहे.
भाजपला येथे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या एन्टी इन कंबन्शीचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १७ जागांमध्ये भाजपच्या वाट्याला एकेरी जागाच येईल, असे मतदार राजा बोलू लागला आहे. चामोर्शीत काँग्रेससोबत अतुल गण्यारपवार व काँग्रेसमधील वायलालवार, नैताम हे गट एकत्रित आले आहे.
याआधीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसमध्ये दुफळी राहत होती. यावेळी सर्व गट व नेते एकसंघ होऊन निवडणुकीला समोर जात आहेत. पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेसजन सावरले असून अत्यंत आत्मविश्वासाने ही निवडणूक काँग्रेस लढत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा दौराही पक्षासाठी नवसंजीवनी देणारा ठरला. भाजपने मात्र या ठिकाणी अद्याप प्रचाराला वेग दिला नाही. नामांकनासाठी शक्ती प्रदर्शन केल्यानंतर भाजपच्या बड्या नेत्यांची येथे सभाही झाली नाही.
भाजपसाठी ही निवडणूक कसोटी लावणारी आहे. त्यानंतरची मोठी नगर पंचायत म्हणजे राजनगरी अहेरी येथे आजवर नाग विदर्भ आंदोलन समितीची निर्विवाद सत्ता ग्राम पंचायतीवर राहत होती. यावेळी नाविसं भारतीय जनता पक्षासोबत मैदानात आहे. त्यामुळे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम सांभाळत आहे. काँग्रेसही मेहबूब अली यांच्या नेतृत्वात सर्व जागा लढवित आहे. याशिवाय रघुनाथ तलांडे यांनीही सर्व जागांवर उमेदवार मैदानात उतरविले आहे. अहेरीतील महाराजांचे परंपरागत वॉर्ड भाजपसाठी विजयाचा मार्ग मोकळा करू देणारे असले तरी अन्य वॉर्डांमध्ये मात्र भाजपासाठी करू वा मरूची लढाई आहे. अपक्षांचे पारडे येथे जड असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही काही जागा खिशात टाकेल, असे चित्र आहे. काँग्रेसचीही परिस्थिती सुधारलेली राहील, असे राजकीय जाणकार मानतात. त्यामुळे भाजपला व पर्यायाने पालकमंत्र्यांना येथे तळ ठोकून राहावे लागत आहे.
मुलचेरात काँग्रेस व माजी आ. दीपक आत्राम हे संयुक्तरित्या लढत आहे. येथे काँग्रेसला चांगले दिवस दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुलचेरा तालुका दीपक आत्राम यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहील. सिरोंचात काँग्रेस, भाजप, आविसं व राकाँ अशी चौरंगी लढत असून येथे आजवर काँग्रेसची अबाधित सत्ता होती.
यावेळी या साऱ्या पक्षाचे त्यांच्यासमोर आवाहन आहे. तालुका काँग्रेस अध्यक्ष अब्दुल रहीम यांच्या नेतृत्वात पक्ष येथे निवडणुकीला समोर जात आहे. भामरागड व एटापल्ली या दुर्गम तालुक्यातही काँग्रेस, राकाँ, भाजप व आविसं यांच्यात तुल्यबळ लढत आहे. भामरागडात काँग्रेसला बऱ्याच दिवसानंतर विजयाची मोठी आशा आहे. एटापल्लीत दीपक आत्राम यांचा आविसं चमत्कार घडविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अहेरी उपविभागात साऱ्याच नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीवर सरकारच्याही कामाचा लेखाजोखा सिद्ध करणाऱ्या ठरणार आहे. मतदार राजा कुणाच्या बाजुने कौल देतो, हे ७ नोव्हेंबरला स्पष्ट होईल. (जिल्हा प्रतिनिधी)