४१० ग्रा.पं.चा आराखडा तयार

By Admin | Updated: June 24, 2016 01:53 IST2016-06-24T01:53:30+5:302016-06-24T01:53:30+5:30

वर्षातील नेमक्या कोणत्या हंगामात कामाची गरज आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी नेमके कोणत्या प्रकारचे काम करणे आवश्यक आहे.

Prepare the draft of 410 gp | ४१० ग्रा.पं.चा आराखडा तयार

४१० ग्रा.पं.चा आराखडा तयार

प्रत्येक कुटुंबाची माहिती : वर्षभरातील रोहयो कामांचे नियोजन; मागणीनुसार मिळणार काम
गडचिरोली : वर्षातील नेमक्या कोणत्या हंगामात कामाची गरज आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी नेमके कोणत्या प्रकारचे काम करणे आवश्यक आहे. कोणत्या कामाला प्रथम प्राधान्य देण्यात यावे, याबाबतचा २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा विकास आराखडा जिल्हाभरातील ४१० ग्रामपंचायतींनी तयार केला आहे. ग्रामसभेने त्याला मंजुरी प्रदान केली आहे. २०१६-१७ या वर्षातील रोहयोची कामे याच आराखड्यानुसार करण्याचे बंधन ग्रामपंचायतीवर व संबंधित यंत्रणेवर राहणार आहे. त्यामुळे या आराखड्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. मागील सात वर्षांपासून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र नागरिकांची कामाची मागणी व प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असलेले काम याबाबत ताळमेळ जोडत नसल्याने काम आहे तेव्हा मजूर मिळत नाही व मजूर रिकामे आहेत. रोहयोचे काम राहत नाही, अशी विपरित परिस्थिती निर्माण होत होती. त्यामुळे नागरिकांना रोजगार मिळण्यास अडचण निर्माण होत होती. ही समस्या सोडविण्यासाठी शासनाने प्रत्येक गावाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरूवात झाली.
ग्रामसेवक, रोहयो विभागाचे तांत्रिक अधिकारी, वन विभाग, सिंचाई विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी गावाचा परिसर फिरून गावाच्या सभोवतालची माहिती जाणून घेतली. प्रत्यक्ष कामाच्या जागेला भेट दिली. त्याबद्दल नागरिकांशी संवाद साधून कामांची यादी तयार केली. या यादीला ग्रामसभेने मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे या कामांची यादी अंतिम मानली जात आहे. जिल्ह्यातील सुमारे ४१० ग्रामपंचायतीनी विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर आता नागरिकांच्या मागणीनुसार रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात याच आराखड्यानुसार काम होणार आहे. त्यामुळे कामांची मागणी व उपलब्धता यामध्ये ताळमेळ जोडला जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)

ज्या मजुरांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात ९० दिवसांपेक्षा अधिक रोहयो काम केले आहे. अशा रोहयो मजुरांना त्यांच्या आवडीप्रमाणे स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. प्रशिक्षणानंतर त्याला रोजगार करता यावा यासाठी बँकेकडून कर्ज मिळावे, यासाठीही मदत केली जाणार आहे. रोहयोचा मजूर पुढे चालून रोहयोच्याच कामावर अवलंबून राहता, त्याने स्वत:चा रोजगार करावा व इतरांनाही त्याने रोजगार द्यावा, ही अपेक्षा यामागे आहे.

Web Title: Prepare the draft of 410 gp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.