पोयारकोठी, मरकनारने केली माओवाद्यांना गावबंदी; माओवाद्यांना धक्का
By संजय तिपाले | Updated: February 20, 2025 18:29 IST2025-02-20T18:28:34+5:302025-02-20T18:29:04+5:30
परिवर्तनवादी पाऊल : दोन भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द

Poyarkothi, Markanar impose village ban on Maoists
संजय तिपाले/गडचिरोली
भामरागड : तालुक्यातील कोठी पोलिस ठाणे हद्दीतील पोयारकोठी व मरकनार या छत्तीसगड सीमेवरील दुर्गम गावांनी मुख्य प्रवाहात येण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. या गावांनी माओवाद्यांना गावात प्रवेश निषिध्द केला आहे. सोबतच दोन भरमार बंदुका पोलिसांकडे सोपविल्या आहेत.
मरकनार गावासाठी ९ फेब्रुवारी रोजी तर पोयारकोठी येथील ग्रामस्थांसाठी २० फेब्रुवारीला पोलिसांनी बैठक घेतली होती. यात सर्वानुमते माओवाद्यांना गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकाऱ्यांना सादर केला होता. गावातील नागरिकांनी दोन भरमार बंदुका देखील पोलिसांना सुपूर्द केल्या. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, यतीश देशमुख, भामरागडचे उपअधीक्षक अमर मोहिते व कोठी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शरद काकळीज यांच्या पुढाकाराने या गावांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
माओवाद्यांना धक्का
अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने पूर्वी या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. गावातील नागरिक आणि युवक माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही, गावातील जंगल परिसरात माओवाद्यांना थांबू देणार नाही, माओवाद्यांच्या मिटींगला जाणार नाही असे आश्वासन ग्रामस्थांनी दिलेे, त्यामुळे माओवाद्यांना धक्का बसला आहे.
२० गावांनी आतापर्यंत माओवाद्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे. सन २००३ पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे.