वीज कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST2021-05-27T04:38:42+5:302021-05-27T04:38:42+5:30
गडचिरोली : वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाइन कामगारांचा दर्जा देण्यात यावा तसेच वीज कर्मचारी विमा ...

वीज कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
गडचिरोली : वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाइन कामगारांचा दर्जा देण्यात यावा तसेच वीज कर्मचारी विमा योजनेसाठी नेमलेली नवीन टीपीए कंपनी बदलण्यात यावी, या मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांनी साेमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. अत्यावश्यक सेवेला फटका बसणार नाही याची खबरदारी घेऊन हे आंदाेलन सुरू असून, तिसऱ्या दिवशी कामगारांकडून निदर्शने करण्यात आली.
कोरोना महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांना विचारात न घेता मेडिअसिस्ट या नवीन टीपीएची नेमणूक केल्यामुळे कर्मचारी व अभियंत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज कंपनीतील सहा संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कोरोनाकाळात सुमारे ४००च्या वर वीज कामगार, अभियंते व कंत्राटी कामगार मृत्यू पावले असून, हजारो कामगार व त्यांचे कुटुंबीय कोरोनामुळे ग्रस्त आहेत. कार्यरत कामगार व अभियंत्यांना फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन प्राधान्याने लसीकरण करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनीने आधीच्या कंपनीला डावलून मेडिअसिस्ट या टीपीएची तीन महिन्यांसाठी हस्तक्षेप करून परस्पर नेमणूक केलेली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बोलाविलेल्या ऑनलाइन बैठकीत सहा संघटनांनी विविध समस्यांबाबत आपली नाराजी दर्शविली. बैठकीत कोणताच तोडगा निघू शकला नाही. तोडगा न निघाल्यामुळे सहा संघटनांनी व्दारसभा घेऊन आंदोलन सुरूच ठेवण्याचे ठरविले आहे.
या व्दारसभेमध्ये एसईएचे सहसचिव पुरुषोत्तम वंजारी, फेडरेशनचे मंडळ अध्यक्ष उदयराज पटालिया, इंटकचे विशाल केळापुरे व विद्युत क्षेत्र तांत्रिक संघटनेचे सुधीर चौधरी तसेच इतर कर्मचारी कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते.