११ केव्हीचे वीज उपकेंद्र रखडले
By Admin | Updated: August 6, 2015 02:18 IST2015-08-06T02:18:24+5:302015-08-06T02:18:24+5:30
चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) व परिसरात जादा विद्युत पुरवठा अनेकदा सुरू असतो. यामुळे विजेचा अपव्यय होतो.

११ केव्हीचे वीज उपकेंद्र रखडले
ंदीड वर्षांचा कालावधी उलटला : केवळ ट्रॉन्सफॉर्मर व खांबच केले उभे
तळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) व परिसरात जादा विद्युत पुरवठा अनेकदा सुरू असतो. यामुळे विजेचा अपव्यय होतो. मात्र यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दीड वर्षांपूर्वी चामोर्शीवरून येणाऱ्या तळोधी व कुनघाडा या दोन गावांच्या विद्युत पुरवठ्यासाठी ११ केव्हीचे स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सदर ११ केव्हीच्या विद्युत उपकेंद्राचे काम गेल्या दीड वर्षांपासून रखडले आहे.
तळोधी (मो.) येथे स्वतंत्र ११ केव्हीच्या विद्युत उपकेंद्र मंजूर झाल्यानंतर विद्युत पोल उभारून रोहित्र बसविण्याचे काम इन्प्रा या नामवंत कंपनीला देण्यात आला. कामाचे आदेश मिळाल्यानंतर या कंपनीच्या पर्यवेक्षकांनी विद्युत खांब उभारून काही ठिकाणी तारा टाकण्यात आल्या. तसेच एक विद्युत रोहित्र तसाच बांधून ठेवण्यात आला. त्यानंतर सदर विद्युत उपकेंद्राचे पुढचे काम ठप्प पडले. कुनघाडा येथे बसविण्यात आलेला विद्युत रोहित्र पूर्णपणे कोसळला असून कामाच्या दिरंगाईबाबत विद्युत विभागाचे अभियंते आपापल्या पद्धतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवित असल्याचे दिसून येते.
११ केव्ही विद्युत उपकेंद्र काम अपूर्णावस्थेत असल्याने विद्युत पुरवठ्याचा तळोधी परिसरातील लपंडाव अद्यापही कायम आहे. तसेच पाच वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेला तळोधी येथील पॉवर स्टेशनचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातल्या त्यात ११ केव्ही विद्युत उपकेंद्राचे काम कंत्राटदार व वरिष्ठ अभियंत्याच्या दिरंगाईमुळे ठप्प पडले आहे. परिणामी जनतेला विद्युत पुरवठ्याच्या लपंडावाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
या प्रश्नाकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन सदर ११ के व्ही विद्युत उपकेंद्राचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात गावातील काही सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिकांनी महावितरण तसेच लोकप्रतिनिधीकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. मात्र दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) येथील ११ केव्ही उपकेंद्राचे काम थंडबस्त्यात आहे. (वार्ताहर)