साडेचार तास वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:01:26+5:30
आठवडाभरापासून जिल्हाभर काही ठिकाणी रिपरिप तर काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. अहेरी उपविभागातही जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे अहेरी शहरातील तहसील कार्यालय मार्गावर झाड कोसळले. अंतर्गत रस्त्यावरील पडलेले झाड उपचलण्याची जबाबदारी नगर पंचायत प्रशासनाची आहे. विद्युत कार्यालयाकडून सकाळीच याबद्दल नगर पंचायत प्रशासनाला माहिती देण्यात आली.

साडेचार तास वीजपुरवठा खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : येथील नवीन तहसील कार्यालय मार्गावरील वीज वितरण कंपनी कार्यालय परिसरात मुसळधार पावसाने मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड कोसळले. त्यामुळे अहेरी शहराचा वीजपुरवठा साडे चार तास खंडित होता व रस्त्यावरील वाहतूकसुद्धा बंद होती. परंतु रस्त्यावर कोसळलेले झाड उचलण्यासाठी नगर पंचायत कर्मचारी दोन तास उशिरा पोहोचले.
आठवडाभरापासून जिल्हाभर काही ठिकाणी रिपरिप तर काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. अहेरी उपविभागातही जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे अहेरी शहरातील तहसील कार्यालय मार्गावर झाड कोसळले. अंतर्गत रस्त्यावरील पडलेले झाड उपचलण्याची जबाबदारी नगर पंचायत प्रशासनाची आहे. विद्युत कार्यालयाकडून सकाळीच याबद्दल नगर पंचायत प्रशासनाला माहिती देण्यात आली. मात्र तब्बल साडे चार तास कोणतेही कर्मचारी झाड हटवायला आले नाही. त्यामुळे अहेरीसह ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा बंद होता आणि तहसील कार्यालय मार्गावरील वाहतूक बंद होती. यानंतर महावितरण कंपनी कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अमित शेंडे यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन काही ठिकाणी फांद्या तोडून विद्युत पुरवठा सुरू केला तर नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजता येऊन झाड तोडण्याचे काम सुरू केले. या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला.
दुर्गम भागात गंभीर स्थिती
पावसाळ्याचे दिवस असल्याने अहेरी तालुक्यासह उपविभागातील अनेक गावांमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होता. या भागात वेळीच विद्युत कर्मचारी पोहोचत नसल्याने दोन ते तीन दिवस नागरिकांना अंधारातच रात्री काढावी लागते. विशेष म्हणजे, अहेरी उपविभागातील विद्युत लाईन जंगलातून गेली आहे. त्यामुळे जरासा वादळवारा सुटल्यास वीज पुरवठा खंडित होते. वादळी पावसामुळे विद्युत लाईनवर झाडे कोसळल्यास बिघाड शोधताना विद्युत कर्मचाऱ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागतात. अनेकदा दोन ते तीन दिवस बिघाड सापडत नाही. त्यामुळे दुर्गम भागात अनियमित वीज पुरवठ्याची गंभीर स्थिती पावसाळ्याच्या दिवसात पाहावयास मिळते. त्यामुळे विद्युत लाईन योग्यप्रकारे रस्त्याजवळून नेणे आवश्यक आहे.