आश्रमशाळांचे खासगीकरण हाणून पाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 01:41 IST2016-02-27T01:41:59+5:302016-02-27T01:41:59+5:30
इंग्रजी शिक्षणाच्या नावावर आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी करून सरकार खासगीकरणासाठी प्रयत्न करीत आहे.

आश्रमशाळांचे खासगीकरण हाणून पाडा
डी. एल. कराड यांचे आवाहन : देसाईगंज येथे आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचा विभागीय मेळावा
देसाईगंज : इंग्रजी शिक्षणाच्या नावावर आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी करून सरकार खासगीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा हा डाव हाणून पाडावा, असे आवाहन आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केले.
आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी संघटनेतर्फे देसाईगंज येथे नुकताच पार पडलेल्या विभागीय मेळाव्यात कराड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे, महासचिव बी. टी. भामरे, डॉ. महेश कोपुलवार उपस्थित होते.
डॉ. कराड म्हणाले, शहरामध्ये इंग्रजी शाळांची संख्या वाढत असली तरी ग्रामीण भागात आजही आश्रमशाळांकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. मात्र सरकारने गेल्या शैक्षणिक सत्रापासून खासगी इंग्रजी शाळा संचालकांचे पोट भरण्यासाठी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची भरती मोहीम सुरू केल्याने आश्रमशाळा ओस पडत आहेत. पर्यायाने येत्या काही वर्षात आश्रमशाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ येईल. ही परिस्थिती समजून आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उदासीनता झटकून रस्त्यावर उतरण्यासाठी तयार राहिले पाहिजे. अधिकाऱ्यांच्या दबावाखाली शाळांतील विद्यार्थी इंग्रजी शाळांत पाठविण्यासाठी शिक्षकांनी सहकार्य करू नये, आदिवासी विकास विभागाने राज्यभर आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधी रूपये खर्च करून सुसज्ज इमारती बांधल्या. मात्र आता या इमारती देशातील मोठ्या उद्योगपतींना विकण्याचा घाट सरकारने रचल्याचा आरोप त्यांनी केला. आश्रमशाळांतील विद्यार्थी दुसरीकडे पाठविण्यापेक्षा सरकारने आश्रमशाळांमध्येच इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. प्रा. दहीवडे म्हणाले, आश्रमशाळांत पुरवठा करण्यात आलेल्या साहित्यात गैरव्यवहार झाला. कोट्यवधींचा खर्च करूनही गरम पाण्याचे हिटर, सौरऊर्जा पाणीपुरवठा योजना, सिलिंडर पुरवठा, सौरकूकर तसेच सिकरूम आदी योजनांचा आजपर्यंत विद्यार्थ्यांना फायदा झाला नाही. आश्रमशाळांचे खासगीकरण करून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे शासनाचे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
प्रास्ताविक खवसे, संचालन एम. एच. निमगडे यांनी तर आभार सुधीर शेंडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)