ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:40 IST2021-04-28T04:40:01+5:302021-04-28T04:40:01+5:30
काेरची : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी तालुक्यातील ...

ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
काेरची : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी तालुक्यातील घाटी, गांगुली, मालदुगी परिसरातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का रस्तादेखील नाही.
कव्हरेजअभावी माेबाइलधारक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांतील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही. टाॅवर व भूमिगत केबल लाइनवर लाखाे रुपये खर्च करूनही सेवेत सुधारणा झाली नाही.
नळाला तोट्या नसल्याने पाण्याचा अपव्यय
गडचिरोली : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत.
शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करा
अहेरी : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत.
खुल्या जागेत कचऱ्याचे साम्राज्य
गडचिरोली : गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात अनेक वाॅर्डांमध्ये ओपन स्पेस आहेत. मात्र, काही मोजक्याच ओपन स्पेसला संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या ओपन स्पेसला संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न. प. प्रशासनाने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करावा.
ग्रामीण भागात पेट्रोेलची अवैध विक्री
एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोल पंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लिटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.
अतिक्रमणाच्या विळख्यात आरमाेरी शहर
आरमोरी : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर, तसेच खुल्या जागांवर नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम बांधले आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून, अपघातांची संख्या वाढली आहे. मात्र, अतिक्रमण काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
चामोर्शी तालुक्यातही गावांना रस्त्याची प्रतीक्षा
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील वेंगनूर येथे अद्यापही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. प्रशासनाने याची दखल घ्यावी. पाणंद रस्त्याचेही खडीकरण न झाल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात त्रास हाेताे.
खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून जेप्रा, दिभना, अमिर्झा, चांभार्डा, आंबेशिवणी, भिकारमौशी, राजगाटा, उसेगाव आदी गावांतील शेकडो नागरिक ये-जा करतात. मार्ग अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा होतो.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमण वाढले
अहेरी : शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्क करतात. त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
खताच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले
गडचिरोली : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. सदर ढिगाऱ्यामुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष हाेत आहे.
राजनगरी अहेरीत घाणीचे साम्राज्य
अहेरी : स्थानिक नगर पंचायत स्वच्छतेबाबत फारशी आग्रही नाही. अनेक ठिकाणी नाल्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसून येत आहे. अहेरी नगर पंचायतीची स्थापना २३ एप्रिल २०१५ रोजी झाली; मात्र अद्यापही समस्या सुटल्या नाहीत.
तंमुसला प्रशिक्षण देण्याची मागणी
रांगी : अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत; मात्र समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तंटामुक्त समित्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. प्रशिक्षण दिल्यास भांडण व तंटे साेडविण्यास मदत हाेईल.
टाकीची सुरक्षा वाऱ्यावर
आरमोरी : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे; परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याची टाकी सुरक्षित करण्याची गरज आहे.
खुटगावात प्रवासी निवारा बांधा
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नवीन प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
देसाईगंजात पार्किंगची समस्या गंभीर
देसाईगंज : मुख्य रहदारीच्या आरमोरी-कुरखेडा मार्गावर वाहनचालक वाटेल तेथे चारचाकी, दुचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे येथील रहदारीस अडथळा होत आहे. शिवाय त्याचा व्यापाऱ्यांसोबतच ग्राहकांनाही फार त्रास होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणधारक व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
मोकाट जनावरांमुळे वाहनधारक त्रस्त
गडचिरोली : दर रविवारी शहरात भरणाऱ्या बाजारात मोकाट गुरांचा हैदोस असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाजारात खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. विक्रेत्यांनी ठेवलेल्या भाजीवरही त्यांची नजर चुकवून ताव मारतात. माेकाट जनावरांचा नगरपालिका प्रशासनाने बंदाेबस्त करावा, अशी मागणी आहे.
उद्याेग उभारण्याची मागणी
भामरागड : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यात उद्याेगधंदे नसल्याने युवकांना बाहेरगावी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे बेराेजगार युवक बाहेर स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे उद्याेग उभारावेत, अशी मागणी आहे.
सावरगाव परिसर दुर्लक्षित
धानोरा : छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरगाव परिसरातील गावांचा विकास रखडला आहे. हा परिसर आदिवासीबहुल व नक्षल प्रभावित आहे. या ठिकाणी नेमण्यात आलेले कर्मचारी नियमित कर्तव्य बजावत नाहीत. अनेक नागरिकांना शासकीय योजनांची माहिती नाही.
वाकडी-बोरी मार्गावर खड्डे
चामाेर्शी : तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाकडी-लखमापूर बोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, या रस्त्यांची अवस्था बकाल झाली आहे. वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष आहे.