आष्टी मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:08 AM2021-03-04T05:08:21+5:302021-03-04T05:08:21+5:30

चामोर्शी : भेंडाळा-आष्टी मार्गावर अनेक गावे आहेत. भेंडाळा परिसरातील नागरिक आष्टीला जाण्यासाठी चामोर्शीवरून न जाता, लखमापूर बोरीमार्गे जाणाऱ्या मार्गाने ...

Poor condition of Ashti Marg | आष्टी मार्गाची दुरवस्था

आष्टी मार्गाची दुरवस्था

googlenewsNext

चामोर्शी : भेंडाळा-आष्टी मार्गावर अनेक गावे आहेत. भेंडाळा परिसरातील नागरिक आष्टीला जाण्यासाठी चामोर्शीवरून न जाता, लखमापूर बोरीमार्गे जाणाऱ्या मार्गाने आष्टीला जातात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.

पेट्रोलची अवैध विक्री

वैरागड : आरमाेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी पेट्रोल पंपावरून पेट्राेल नेतात. गावात अधिक दराने पेट्राेलची विक्री केली जात आहे.

जिल्हाभरात जळाऊ लाकडांचा तुटवडा

गडचिरोली : जिल्हाभरातील वनविभागाच्या डेपोमध्ये जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठीही लाकडे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. लाकडांचा पुरवठा करावा.

देलाेडा-सूर्यडाेंगरी मार्ग उखडला

वडधा : देलाेडा-सूर्यडाेंगरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

विटा बनविण्याच्या कामास वेग

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यात मोठ्या प्रमाणात विटांची निर्मिती केली जाते. विटांची मागणी वाढली असल्याने, विटा बनविण्याच्या कामास वेग आला आहे. अनेकांना येथून राेजगार मिळाला आहे. पुन्हा चार महिने विटा व्यवसाय चालणार आहे.

लिंक फेलमुळे कामे ठप्प

अहेरी : केंद्र शासनाने विविध योजनेची प्रक्रिया व प्रशासकीय कामे ऑनलाइन केली आहे. त्यामुळे योजनेचे अनेक लाभार्थी, तसेच कर्मचारीही बरीच कामे ऑनलाइन स्वरूपात करीत आहेत. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून बीएसएनएल, तसेच खासगी कंपन्यांची लिंक फेल असल्याने ऑनलाइन कामे प्रभावित होत आहे.

केरोसिनचा पुरवठाच नाही

आष्टी : दुर्गम भागात बहुतांश नागरिक अजूनही चुलीवरच स्वयंपाक करतात. मात्र, मागील काही दिवसांपासून केरोसिनचा पुरवठा कमी झाल्याने महिलांची अडचण वाढली आहे. केरोसिनचा पुरवठा करण्याची मागणी होत असतानाही शासन मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे. ग्रामीण भागात केराेसिनचा पुरवठा अपुरा आहे.

योजनांची जनजागृती करा

भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे.

पाण्याचा अपव्यय

देसाईगंंज : नगरपरिषदेचे काही ठिकाणी सार्वजनिक नळ आहेत. गरीब नागरिकांना नळाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सदर सार्वजनिक नळ आहेत. मात्र, या एकाही नळाला तोट्या नाहीत. परिणामी, नळ आल्यापासून ते शेवटपर्यंत पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

‘ते’ वीज खांब धाेक्याचे

जिमलगट्टा : येथील मुख्य रस्त्यालगत असलेला विद्युत खांब गंजला आहे. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्ह्याभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. मात्र, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत चालले आहे.

पाणी टाक्या असुरक्षित

गडचिरोली : पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे, परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी प्रशासन गंभीर नसल्याचे दिसते. प्रत्येक पाणी टाकीला कुंपण करून पाणी टाकीच्या क्षेत्रात प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. सातत्याने मागणी करूनही संरक्षक भिंत बांधण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे.

शिधापत्रिका मिळेना

कुरखेडा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना शिधापत्रिका मिळाली नसल्याने अजूनही ते वंचित आहेत. तहसील कार्यालयात परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज केल्यानंतरही तालुक्यातील एपीएल नागरिकांना शिधापत्रिका देण्यात आल्या नाही. अर्ज केल्यानंतरही अनेक महिने नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागते.

कडेलगत वाहनांची गर्दी

गडचिरोली : चामोर्शी मार्गाने सेमानाकडे प्रचंड वाहतूक वाढली आहे. दरम्यान, या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी व दुचाकी वाहने उभ्या केल्या जातात. यामुळे आवागमन करणाऱ्या वाहनांना रस्ता उरत नाही. परिणामी, अपघाताची शक्यता बळावली आहे. पोलीस व परिवहन विभागाने वाहनावर कारवाई करावी.

बाजारात स्वच्छतागृह द्या

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी नाहक त्रास सहन करावा लागतात. या ठिकाणी स्वच्छतागृह निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Poor condition of Ashti Marg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.