कृषिपंप ट्रान्सफार्मरची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST2021-05-27T04:38:22+5:302021-05-27T04:38:22+5:30
देसाईगंज : तालुक्यात दुबार-तिबार पीक लागवडीतून भरघोस उत्पन्न घेण्यासाठी सुरू झालेली धडपड व यासाठी कृषिपंपांचा सुरू झालेला वापरच आता ...

कृषिपंप ट्रान्सफार्मरची दुरवस्था
देसाईगंज : तालुक्यात दुबार-तिबार पीक लागवडीतून भरघोस उत्पन्न घेण्यासाठी सुरू झालेली धडपड व यासाठी कृषिपंपांचा सुरू झालेला वापरच आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठू लागल्याची गंभीर माहिती समोर येऊ लागली आहे. दरम्यान, तालुक्यातील एकही ट्रान्सफार्मर सुस्थितीत नसून ट्रान्सफार्मरमधील सर्वच फेजची ऐशीतैसी झालेली आहे. बऱ्याचदा लाईनमनअभावी शेतकऱ्यांनाच डीपी बाॅक्स हाताळावे लागत असल्याने याप्रती संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गाव तिथे लाईनमन असे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने अलीकडे कृषी क्षेत्रात प्रचंड चुरस निर्माण झाली असून, शासकीय स्तरावरून देण्यात आलेल्या सिंचन विहिरी, विंधन विहिरी बेरोजगारीवर मात करण्यासाठी पर्याय ठरू लागल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी कृषी पंपांचा वापर करणे सुरू केले आहे. मात्र, एकाच लाईनमनकडे पाच-पाच गावांचा प्रभार असल्याने लावण्यात आलेल्या ट्रान्सफार्मरच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
तालुक्यात जराही ओव्हरलोड झाल्यास वारंवार फ्यूज उडणे ही समस्या नेहमीच झाली आहे. यामुळे सिंचन सुविधा प्रभावित होत आहे. ओव्हरलोडने फ्यूज अचानक उडतात. वारंवार हेच होत असल्याने गावागावांत फ्यूज तार टाकणारे तयार झाले आहेत. ते ओव्हरलोड झाल्यानंतरही न उडणारे ठोकळ स्वरुपाचे फ्यूज तार टाकतात. त्यामुळे ट्रान्सफार्मरमधील साहित्य जळून खाक होते. तालुक्यातील बहुतांश भागातील ट्रान्सफार्मर आतून भस्म झालेले आहेत. शेतकऱ्यांना लाईनमन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने पर्यायाने गावातीलच ट्रान्सफार्मर हाताळणाऱ्या व्यक्तीला हाताशी धरून फ्यूज टाकून सिंचन सुविधा नियमित करावी लागते.
डीपी बाॅक्समधील फ्यूज लाॅकसिस्टीमचे असले तरी गरजेच्या वेळी डीपी बाॅक्स जबरदस्तीने उघडल्या जात असल्याने लाॅक तुटलेले दरवाजे सताड उघडे राहतात. त्या असुरक्षित डीपी रस्त्यांच्या कडेला वा शेतात सतार उघड्या असतात. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स :
अतिरिक्त लाईनमन देण्याची मागणी
लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. देसाईगंज तालुक्यातील बहुतांश भागातील ट्रान्सफार्मर दुरवस्थेत आहेत. या ट्रान्सफार्मरच्या आतील जळालेले फेज बदलून त्या जागी नवीन लावावे आणि डी.पी. बॉक्स कुलूपबंद करण्यात यावे व गावातील नेमलेल्या लाईनमनकडील गावांचा अतिरिक्त भार काढून त्या-त्या ठिकाणी अतिरिक्त लाईनमन देण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.