पोलिसांची गुरूसाई कॉलेजवर धाड
By Admin | Updated: January 18, 2015 22:42 IST2015-01-18T22:42:40+5:302015-01-18T22:42:40+5:30
जिल्ह्यातील सहा महाविद्यालयांनी क्षमतेपेक्षा जास्त बोगस विद्यार्थी दाखवून दोन कोटी नऊ लाख २७ हजार रूपयाची शिष्यवृत्ती फस्त केली. यात आष्टी येथील गुरूसाई कॉलेज आॅफ टेक्नीकल

पोलिसांची गुरूसाई कॉलेजवर धाड
आष्टी : जिल्ह्यातील सहा महाविद्यालयांनी क्षमतेपेक्षा जास्त बोगस विद्यार्थी दाखवून दोन कोटी नऊ लाख २७ हजार रूपयाची शिष्यवृत्ती फस्त केली. यात आष्टी येथील गुरूसाई कॉलेज आॅफ टेक्नीकल अँड मॅनेजमेंट याचाही समावेश आहे. कारवाईच्या मागणीची दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने आष्टी येथे येऊन या कॉलेजवर धाड टाकून चौकशी केली.
आष्टी येथे तीन वर्षांपूर्वी गुरूसाई कॉलेज आॅफ टेक्नीकल अँड मॅनेजमेंट नावाने कॉलेज सुरू करण्यात आले. येथे प्राचार्य म्हणून धुरके काम पाहत होते. काही दिवसानंतर या कॉलेजच्या संस्थाचालकांनी कॉलेजसाठी बीएसएनएल टॉवरच्या मागे एक प्रशस्त इमारत उभारली. कॉलेजजवळ व आलापल्ली मार्गावर कॉलेजचे नाव असलेले फलक लावण्यात आलेले होते. १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींवर प्रवेश दिल्या जात होता. परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी सुरूवातीला या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजच्या १७ विद्यार्थिनी आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहत होत्या. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून सदर कॉलेज बंद असल्याने या विद्यार्थिनी वसतिगृहात गैरहजर असल्याची बाबही पुढे आली आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर या महाविद्यालयाचे फलक आता हटविण्यात आले आहे. कॉलेजचा चौकीदारही तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. सध्या हे कॉलेज बंद अवस्थेत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या कॉलेजची बाहेरून पाहणी करून पंचनामा केला. चंद्रपूरच्या संस्थाचालकांची चौकशी होणार अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या या संस्थेचा चालक फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर आहे.