नक्षल्यांच्या हल्ल्यात पोलीस जवान जखमी, नक्षल्यांकडील पिस्तूल व काडतुसं जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 20:36 IST2018-03-04T20:36:23+5:302018-03-04T20:36:23+5:30
एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथील आठवडी बाजारात गस्त करीत असलेल्या पोलीस पथकातील एका जवानावर नक्षल्यांनी हल्ला करून त्याच्याकडील रायफल हिसकण्याचा प्रयत्न केला.

नक्षल्यांच्या हल्ल्यात पोलीस जवान जखमी, नक्षल्यांकडील पिस्तूल व काडतुसं जप्त
एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथील आठवडी बाजारात गस्त करीत असलेल्या पोलीस पथकातील एका जवानावर नक्षल्यांनी हल्ला करून त्याच्याकडील रायफल हिसकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी होत नसल्याचे पाहून चाकूने हल्ला केला. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान गट्टाच्या बाजार परिसरात पायी गस्त घालत होते. यावेळी पोलीस नाईक गोंजी मट्टामी हे इतर सहका-यांपेक्षा मागे राहिले. त्यांना एकटे पाहून त्या परिसरात साध्या वेषात असलेल्या दोन ते तीन नक्षल्यांनी मट्टामी यांच्याकडील एके-४७ ही रायफल हिसकण्याचा प्रयत्न केला. मात्र मट्टामी यांनी जोरदार प्रतिकार करीत आपली रायफल नक्षल्यांच्या हाती लागू दिली नाही. यामुळे नक्षल्यांनी मट्टामीवर चालविण्यासाठी त्यांच्याकडील पिस्तूल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता मट्टामी यांनी ती पिस्तूल हिसकावून आपल्या ताब्यात घेतली.
याच वेळी एका नक्षलवाद्याने चाकूने मट्टामी यांच्या छातीच्या खालील बाजूस भोसकले. यामुळे मट्टामी गंभीर जखमी झाले. यावेळी पोलीस पथकातील सहकारी मदतीसाठी धावले असता नक्षल्यांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला. प्राथमिक उपचार केल्यानंतर गोंजी मट्टामी यांना गडचिरोलीवरून बोलविलेल्या पोलिसांच्या सेवेतील हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.