पोलीस रस्ते, दळणवळण, वीज पुरवठा, दूरसंचारच्या अभावामुळे बेजार
By Admin | Updated: January 20, 2015 00:04 IST2015-01-20T00:04:34+5:302015-01-20T00:04:34+5:30
गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशील दुर्गम भाग म्हणून एटापल्ली तालुका ओळखला जातो. नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलीस जवान स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. मात्र त्यांच्या जीवाची किमत काय,

पोलीस रस्ते, दळणवळण, वीज पुरवठा, दूरसंचारच्या अभावामुळे बेजार
गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशील दुर्गम भाग म्हणून एटापल्ली तालुका ओळखला जातो. नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलीस जवान स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. मात्र त्यांच्या जीवाची किमत काय, असा प्रश्न त्यांना उपलब्ध करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांवरून कुणालाही पडू शकतो. एटापल्ली तालुक्यातील सर्वच संवेदनशील पोलीस स्टेशनमधील शिपाई विविध समस्यांना तोंड देत आहे. एकीकडे कुटुंबापासून दूर राहत जीव धोक्यात घालून देशाच्या रक्षणाकरिता कर्तव्य बजावित आहे तर दुसरीकडे विविध समस्यांमुळे ते तणावात जगत आहेत.
अनेक भागात पोलिसांना राहण्यासाठी वसाहतीचीही सुविधा नाही. आरोग्याचाही प्रश्न कायम सतावत असतोे. नक्षलग्रस्त भागातील जवानांना सोयीसुविधा पुरविण्याचा दावा वेळोवेळी शासन करीत असले तरी दुर्गम भागात राहणारे पोलीस जवान सध्या अनंत अडचणी सहन करीत आहे. एटापल्ली तालुक्यात एटापल्ली, गट्टा, कसनसूर, जारावंडी हे जुने पोलीस ठाणे आहेत. मागील दोन वर्षाच्या काळात हालेवारा, हेडरी, बुर्गी हे नवे पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले आहे.
एटापल्ली तालुका हा नक्षली कारवायांच्यादृष्टीने अतिसंवेदनशिल भाग आहे. एटापल्ली गाव वगळता अन्यत्र कुठेही दूरसंचार सेवा पोहोचलेली नाही. तसेच रस्ते व दळणवळणाचा अभाव, वीज पुरवठा अशा अनेक समस्या सामान्य जनतेप्रमाणेच पोलीस जवानांसाठीही अडचणीच्या ठरत आहे.
एटापल्लीत पोलीस ठाण्यासाठी किंवा वसाहतीसाठी नव्याने जागा घेतो म्हटले तरीही गावाबाहेर ती घ्यावी लागेल, अशी परिस्थिती आहे. १९८० च्या वनकायद्यामुळे पोलीस वसाहतीसाठी दुर्गम भागात जागा मिळणे कठीण आहे. नव्याने जे पोलीस ठाणे निर्माण झाले त्यांना चार ते पाच एकर जागा देण्यात आली आहे. गट्टा येथे पोलीस वसाहतीचे काम निर्माणाधिन आहे.
एटापल्ली तालुक्यात पोलीस उपनिरिक्षक व काही पोलीस कर्मचारी हे मुंबई, पुणे, औरंगाबाद नाशिक व मराठवाडा भागातून बदलीवर आलेले आहे. ते येथे किमान तीन वर्ष सेवा देतात. त्यानंतर येथून बदलून जातात. परंतु बदलीवर येताना एटापल्ली तालुक्यात पोलीस ठाण्याच्या परिसरात क्वॉर्टर नसल्याने ते आपले कुटुंब आणू शकत नाही. परिवाराविना त्यांना येथे राहावे लागते. कुटुंब सोडून येथे सेवा बजाविताना त्यांच्या मन:स्थितीवरही परिणाम होतो, असे अनेकजण खासगीत सांगतात. जे कर्मचारी येथे कुटुंबासह आहेत, ते ही सोयीसुविधांच्या अभावी कसेबसे दिवस काढून आपले कर्तव्य पार पाडतात.