पोलिसांनी दिली आदिवासींना दिवाळीची भेट

By Admin | Updated: October 29, 2016 01:48 IST2016-10-29T01:48:43+5:302016-10-29T01:48:43+5:30

जिल्हा पोलीस दल व आविष्कार करिअर अ‍ॅकॅडमी पुणे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त अशा दामरंचा गावात आदिवासी महिला,

Police gave Diwali gift to the tribals | पोलिसांनी दिली आदिवासींना दिवाळीची भेट

पोलिसांनी दिली आदिवासींना दिवाळीची भेट

आविष्कार करिअर अ‍ॅकॅडमीचा उपक्रम : अतिदुर्गम दामरंचात पोहोचले पोलीस अधीक्षक
अहेरी : जिल्हा पोलीस दल व आविष्कार करिअर अ‍ॅकॅडमी पुणे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त अशा दामरंचा गावात आदिवासी महिला, पुरूष तसेच बालकांसह सर्व नागरिकांना दिवाळीनिमित्त गुरूवारी भेटवस्तू देण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे अतिदुर्गम दामरंचा गावात पोहोचले व त्यांनी तेथील आदिवासी नागरिकांशी थेट संवाद साधला.
दामरंचाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांच्या संकल्पनेतून पुणे येथील आविष्कार करिअर अ‍ॅकॅडमी राष्ट्रीय सेवा योजना, जयनाथ मित्रमंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ व कनीपनाथ मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने पुणे येथे शालेय बॅग, कम्पास पेटी, बुक, पेन, महिलांसाठी साड्या, पुरूषांसाठी शर्ट-पॅन्ट तसेच इतर नवीन वस्तू मिळून एकूण दोन ते अडीच लाखांच्या नवीन भेट वस्तू जमा करण्यात आल्या. त्यानंतर गुरूवारी पोलीस दल व आविष्कार करिअर अ‍ॅकॅडमी पुणे यांच्यातर्फे दामरंचा येथील कार्यक्रमात या भेट वस्तू नागरिक व विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, दामरंचाचे प्रभारी पोलीस अधिकारी विलास मोरे, आविष्कार अ‍ॅकॅडमी पुणेचे अतुल मडकर, प्रवीण झिटे आदी उपस्थित होते.
पोलीस दल सदैव आदिवासी नागरिकांच्या पाठिशी आहे. त्यामुळे समाजविघातक कृत्यांना सोडून पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी केले. एसडीपीओ जाधव यांनी नागरिकांना समाजविघात कृत्यांना साथ न देण्याची शपथ दिली. यावेळी दामरंचा, नैनगुडम, मांड्रा येथील शेकडो नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पीएसआय अनिल वलटे, नागनाथ पाटील व पोलीस जवानांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Police gave Diwali gift to the tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.