पेनगुंडात माओवाद्यांचे स्मारक पोलिसांनी केले उद्धवस्त
By संजय तिपाले | Updated: December 28, 2024 23:07 IST2024-12-28T23:07:15+5:302024-12-28T23:07:36+5:30
छत्तीसगड सीमेवर कारवाई: आधी बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी.

पेनगुंडात माओवाद्यांचे स्मारक पोलिसांनी केले उद्धवस्त
संजय तिपाले/ गडचिरोली
गडचिरोली : माओवाद्यांचे वर्चस्व असलेल्या भामरागडच्या छत्तीसगड सीमेवर पोलिस दलाने नव्यानेच पेनगुंडा हे पोलिस मदत केंद्र सुरु केले आहे. पेनगुंडा हद्दीतील पेनगुंडा ते नेलगुंडा मार्गावर दोन किलोमीटरवर माओवाद्यांनी उभारलेले स्मारक पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी उद्धवस्त करुन दहशत मोडण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले.
पेनगुंडा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर माओवाद्यांनी नवीन पोलिस मदत केंद्र निर्मितीच्या अगोदरच त्यांचे स्मारक बांधलेले होते.२८ डिसेंबरला याबाबत माहिती मिळताच जिल्हा पोलिस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथक, प्राणहिता व विशेष अभियान पथक प्राणहिताच्या चार पथकातील जवानांनी सदर शोध अभियान राबविले. पेनगंुडा ते नेलगुंडा रोडवर माओवाद्यांनी बांधलेले स्मारक दिसून आले. पथकाने परिसराची कसून तपासणी केली व त्यानंतर विशेष अभियान पथकातील जवानांनी सदर माओवाद्यांनी बांधलेले स्मारक उध्वस्थ केले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतीश देशमुख, एम. रमेश व श्रेणीक लोढा, उपअधीक्षक विशाल नागरगोेजे व अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नक्षलविरोधी अभियान तीव्र
या भागात माओवादविरोधी अभियान तीव्र केले आहे. माओवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. अशा माओवाद्यांच्या स्मारकाला समाजात कुठेच स्थान नाही व त्यामुळे कोणीही असे बेकायदेशीर कृत्य करु नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.