नक्षल्यांशी लढणाऱ्या १० शूर जवानांना पोलीस शौर्य पदक
By Admin | Updated: August 15, 2016 00:43 IST2016-08-15T00:43:30+5:302016-08-15T00:43:30+5:30
गडचिरोली पोलीस दलात नक्षल्यांच्या विरोधात लढणाऱ्या १० शूर जीगरबाज पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या गृह विभागाने रविवारी पोलीस शौर्य पदक मंजूर केले आहे.

नक्षल्यांशी लढणाऱ्या १० शूर जवानांना पोलीस शौर्य पदक
जाहीर : एका सहायक फौजदारांना पीएमएमएस पदक
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलात नक्षल्यांच्या विरोधात लढणाऱ्या १० शूर जीगरबाज पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या गृह विभागाने रविवारी पोलीस शौर्य पदक मंजूर केले आहे. विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे कार्यरत असलेले सहायक फौजदार अनिल मधुकरराव दांगट यांना पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेकरीता पीएमएमएस पदक जाहीर केले आहे.
पोलीस शौर्य पदक मंजूर झालेल्या नऊ पोलीस जवानांमध्ये सहायक पोलीस निरिक्षक अतुल श्रावण तवाडे, पोलीस नाईक शिपाई इंदरशहा वासुदेव सडमेक, प्रविण हंसराज भसारकर, बाबुराव महारू पदा, विनोद मेस्सो हिचामी, पोलीस हवालदार बस्तर लक्ष्मण मडावी, पोलीस नाईक शिपाई दिलीप ऋषी पोरेटी, दिनकरशहा बालसिंग कोरेटी, देवनाथ खुशाल काटेंगे, संजय लेंगाजी उसेंडी यांचा समावेश आहे. अती नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या या दहा लढवय्या पोलिसांनी जीवाला धोका पत्कारून केलेल्या कार्यासाठी त्यांना भारत सरकारतर्फे पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.
१७ आॅक्टोबर २०१३ रोजी एटापल्ली तालुक्यातील कसूरवाही, पेंदूलवाही, गोटीनवडा जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविताना झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत सहायक पोलीस निरिक्षक अतुल तवाडे, नाईक शिपाई इंदरशहा सडमेक, प्रविण भसारकर, बाबुराव पदा, विनोद हिचामी यांनी नक्षल्यांशी लढा दिला. नक्षली जंगलात पसार झाले. या कामगिरीसाठी पाच जणांना पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. १२ आॅगस्ट २०१४ रोजी खोब्रामेंढा जंगल परिसरात पोलीस व नक्षल यांच्यात चकमक उडाली. यावेळी पोलीस हवालदार बस्तर मडावी, पोलीस नाईक शिपाई दिलीप पोरेटी, दिनकरशहा कोरेटी, देवनाथ काटेंगे, संजय उसेंडी या पाच जवानांनी नक्षल्यांशी लढा देऊन दोन नक्षलमृतादेहासह एक रायफल व इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात यश मिळविले. यासाठी त्यांना शौर्य पदक जाहीर केले. या पोलीस जवानांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सोमवारी पोलीस मुख्यालयात सन्मानित केले जाणार आहे.