अकार्निया वनस्पतीने तलाव धोक्यात
By Admin | Updated: January 13, 2016 02:01 IST2016-01-13T02:01:24+5:302016-01-13T02:01:24+5:30
येथील गावाजवळ असलेल्या तलावात अकार्निया वनस्पतींची वाढ झाली आहे. त्यामुळे मासेमारी धोक्यात आली असून मासेमारी संस्थेला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

अकार्निया वनस्पतीने तलाव धोक्यात
मासेमारीस अडचण : उपाययोजना करण्याची होत आहे मागणी
चामोर्शी : येथील गावाजवळ असलेल्या तलावात अकार्निया वनस्पतींची वाढ झाली आहे. त्यामुळे मासेमारी धोक्यात आली असून मासेमारी संस्थेला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. सिंचाई व महसूल विभागाने या तलावातील अकार्निया वनस्पती नष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थ तसेच जय वाल्मिकी मत्स्य व्यवसाय संस्थेच्या सदस्यांनी केली आहे.
येथील तलाव २१.१५ हेक्टर आर जागेत विस्तारले आहे. पाच वर्षांपासून या तलावात अकार्निया वनस्पतीची वाढ झाली आहे. या वनस्पतीने तलाव एवढे आच्छादले आहे की, या तलावातील पाणीसुद्धा दिसत नाही. त्यामुळे गुरांना पाणी पाजणे, कपडे धुणे यासह मासेमारी करण्यास अडचण निर्माण होत आहे. मागील १० वर्षांपासून या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. पाळीला दगडाची पिचिंगसुद्धा करण्यात आली नाही. जय वाल्मिकी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेने २०१२ ते २०१७ पर्यंत करार नाम्यावर तलाव मासेमारीसाठी घेतले आहे. या ठिकाणी मत्स्य बिजही सोडण्यात आले आहे. मात्र अकार्निया वनस्पतीमुळे मासेमारी धोक्यात आली आहे. परिणामी या गावातील केवट समाज आर्थिक अडचणीत आला आहे. अकार्निया वनस्पतीमुळे तलावाची पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. याच ठिकाणी शहरातील गौरी, गणपती, दुर्गा देवींचे विसर्जन करण्यात येते. विसर्जनाच्या वेळी तात्पुरती सोय म्हणून थोडीफार अकार्निया वनस्पती बाजुला सरकविली जाते.
महसूल व सिंचाई विभागाने या तलावातील अकार्निया वनस्पती नष्ट करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी संस्थेच्या अध्यक्षा मंदा सरपे, उपाध्यक्ष कान्हू कोसमशिले, सदस्य विश्वनाथ वाघाडे, उष्टू कस्तुरे, मंगेश सातारे, मारोती सातारे, लक्ष्मण सातारे, नरेश शिंदे, तडकडू भलवे, देवाजी सातारे, गणपती सरपे, सोमाजी सातारे यांच्यासह जय वाल्मिकी मत्स्य व्यवसाय संस्थेच्या इतर सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)