सिराेंचा - आसरअल्ली मार्गाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:39 AM2021-04-23T04:39:32+5:302021-04-23T04:39:32+5:30

सिरोंचा : सिरोंचा - आसरअल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे काम काही वर्षांपूर्वी झाले होते. परंतु जड वाहतुकीमुळे या रस्त्याची वाट ...

The plight of Siraencha - Asaralli road | सिराेंचा - आसरअल्ली मार्गाची दुर्दशा

सिराेंचा - आसरअल्ली मार्गाची दुर्दशा

Next

सिरोंचा : सिरोंचा - आसरअल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे काम काही वर्षांपूर्वी झाले होते. परंतु जड वाहतुकीमुळे या रस्त्याची वाट लागली. सध्या ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाल्याने या मार्गे आवागमन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी या मार्गाची दुरूस्ती केली जाते.

पळसगावजवळ उंच पूल बांधण्याची मागणी

जोगीसाखरा : जोगीसाखरा ते पळसगाव मार्गावर ३५ वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. परंतु सदर पूल ठेंगणा आहे. पावसाळ्यात येथून पुराचे पाणी वाहत असते. त्यामुळे मार्गावरील वाहतूक अनेकदा ठप्प होते. याठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी जोगीसाखरा व पळसगाव येथील नागरिकांनी केली आहे.

रांगी-चातगाव मार्गाची दुरवस्था

रांगी : पिसेवडधा-रांगी-चातगाव मार्गावरील बेलगाव जवळचा रस्ता खड्डे पडून उखडला आहे. या मार्गाने आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सदर मार्गाची दुरूस्ती करण्याची गरज आहे. अंगारा तसेच कोरची पासून गडचिरोली येथे ये-जा करण्याकरिता अनेक नागरिक याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे.

पोहार नदीवर पूल कधी बांधणार

तळोधी मो. : चामोर्शी तालुक्यातील चितेकन्हार व सलंगटोला या दोन गावांचा इतर गावांशी संपर्क जोडण्यासाठी दोन वर्षांपूर्वी पोहार नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सदर पूल २०१७ च्या जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे कोसळला. त्यानंतर येथे नवा पूल उभारण्यात आला नाही.

सफाई कामगारांना किमान मजुरी द्या

गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली येथे कार्यरत सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार मजुरी द्यावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत अनेक सफाई कामगार कार्यरत आहेत. यातील बहुतांश कामगार गडचिरोली शहरातच राहतात. मात्र कामगारांना केवळ १२० ते १५० रुपये एवढीच मजुरी कंत्राटदारामार्फत दिली जात आहे.

राजनगरी अहेरीत घाणीचे साम्राज्य

अहेरी : स्थानिक नगरपंचायत स्वच्छतेबाबत फारशी आग्रही नाही. अनेक ठिकाणी नाल्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे सांडपाणी ररस्त्यावरून वाहताना दिसून येत आहे. अहेरी नगरपंचायतीची स्थापना २३ एप्रिल २०१५ रोजी झाली. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर विकासाला गती मिळेल, अशी आशा शहरवासीय बाळगुण होते. मात्र ही अपेक्षा खोटी ठरली आहे.

डुक्कर बंदोबस्त मोहीम सुरू होणार

गडचिरोली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सन २०१७, २०१८ व २०१९ या वर्षात तीनदा मोकाट डुक्कर पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. मात्र पुन्हा शहराच्या विविध भागात मोकाट डुक्करांचा हैैदोस वाढला आहे. पालिकेने डुकर पकडण्याची मोहीम सुरू करावी, अशी मागणी आहे.

अवाढव्य शुल्काने बेरोजगार हैराण

गडचिरोली : विविध शासकीय विभागाच्या नोकर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या कामासाठी खासगी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटकडून संबंधित उमेदवाराकडून अवाढव्य शुल्क वसूल केले जात आहे. त्यामुळे शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणारे सर्वसामान्य बेरोजगार युवक हैराण झाले आहेत. एका पदाचा फार्म भरण्यासाठी उमेदवारांकडून १०० ते १५० रुपये घेतले जात आहेत.

खड्ड्यांमुळे प्रवाशांना २५ किमीचा फेरा

अहेरी : अहेरी-कन्नेपल्ली मार्गावर खड्डे पडल्याने या मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र मार्गाच्या दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अहेरी-कन्नेपल्ली मार्ग सोयीचा आहे.

शासकीय विहिरीवर खासगी पंपांचा कब्जा

धानाेरा : तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणी पंप लावण्यात आले आहेत. मात्र याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाही. ग्रामपंचायतीने स्वत: दखल घेऊन अशा प्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष आहे.

परवानगी न घेताच घरांचे बांधकाम वाढले

गडचिराेली : नगरपरिषद क्षेत्रात घराचे बांधकाम करायचे असेल तर नगरपरिषदेकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र शहरातील बहुतांश घरमालक नगरपरिषदेकडे परवानगी न घेताच घरांचे बांधकाम करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नगरपरिषदेने कारवाई करण्याची गरज आहे.

सिरोंचातील थ्री-जी सेवा सुधारा

सिरोंचा : सिरोंचा येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवा प्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.

कठड्यांअभावी वृक्षसंवर्धन धोक्यात

काेरची : तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण केले आहे. मात्र या वृक्षांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी कठडे बांधण्यात आले नाही. त्यामुळे लावलेले वृक्ष जनावरांचे खाद्य बनत चालले आहे. अर्ध्यापेक्षा अधिक वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कठडे पुरविण्याची मागणी आहे.

Web Title: The plight of Siraencha - Asaralli road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.