आरमोरी तालुक्यात २११७ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST2021-04-08T04:36:55+5:302021-04-08T04:36:55+5:30

आरमोरी : तालुक्यातील ११३ गावांपैकी ८५ गावांतील २११७ हेक्टर क्षेत्रामध्ये यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. ...

Planting of summer paddy in 2117 hectare area in Armori taluka | आरमोरी तालुक्यात २११७ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड

आरमोरी तालुक्यात २११७ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड

आरमोरी : तालुक्यातील ११३ गावांपैकी ८५ गावांतील २११७ हेक्टर क्षेत्रामध्ये यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतात बांधलेल्या विहिरी, शेततळे व बोअर मारल्याने शेतात सिंचनाची सुविधा निर्माण झाली. त्यामुळेच शेतकरी उन्हाळी धान पिकाकडे वळला आहे.

आरमोरी तालुक्यात आरमोरी, देऊळगाव, वैरागड, पिसेवडधा हे चार महसूल मंडळ आहेत. या चार महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या १०३ गावांपैकी ८५ गावांतील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. उन्हाळी धान पिकाच्या एकूण १२०४ सर्वसाधारण क्षेत्रापैकी २११७ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पीक आहे. यापैकी आरमोरी महसूल मंडळात एकूण ६२१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ११९४ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची पेरणी झाली आहे. आरमोरी परिसरात असलेली सिंचन सुविधा व इटीयाडोह धरणाचे पाणी उन्हाळी धान पिकाला मिळत असल्याने आरमोरी महसूल मंडळात उन्हाळी धान पिकाचे क्षेत्र यावर्षी वाढले आहे.

वैरागड महसूल मंडळात २८७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ३३१ हेक्टर क्षेत्रात, देऊळगाव महसूल मंडळात १४० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ३६३ हेक्टरमध्ये तर सर्वांत कमी म्हणजे पिसेवडधा महसूल मंडळात १५५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी २२९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड झाली आहे.

मागील खरीप हंगामात आलेल्या महापुरामुळे व धान पिकावर झालेल्या विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान पीक उद्‌ध्वस्त झाले होते. त्यामुळे उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली होती. खरीप हंगामात धान पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी उन्हाळी धान पिकाकडे वळला आहे. पावसाळी खरीप धान पिकाच्या उत्पादनापेक्षा उन्हाळी धान पिकाचे उत्पादन अधिक होत असल्याने तालुक्यातील ज्या शेतकऱ्याकडे शेतात स्वतःची सिंचन सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची पेरणी केलेली आहे.

आरमोरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने उन्हाळी धान पिकासाठी १२०४ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करून नियोजन केले होते. परंतु नियोजनाच्या दीड पटीपेक्षा अधिक क्षेत्रात तालुक्यातील शेतकऱ्यांनी धान पिकाची रोवणी केली आहे. खरीप पावसाळी धान पिकापेक्षा उन्हाळी धान पीक लागवडीचा खर्च कमी व पावसाळीपेक्षा उत्पादन जास्त मिळत असल्याने उन्हाळी धान पीक फायदेशीर असल्याने लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दरवर्षी वाढत चालला आहे.

आरमोरी तालुक्यात मागील खरीप हंगामात चांगल्या प्रकारे पाऊस पडल्याने अनेक तलावांत पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे. जलयुक्त शिवाराची कामेही बऱ्यापैकी झाली आहेत. सिंचन विहिरींची संख्याही वाढली आहे. तसेच अनेक गावातील शेतकऱ्यांनी शेतात बोअर मारून मोटारपंपाद्वारे शेतीला पाणी देत आहेत, तर अनेक गावातील नदीकाठावरील शेतकऱ्यांनी पाइपलाइन टाकून थेट शेतात पाणी आणत आहेत. त्यामुळे उन्हाळी धान पिकाचे क्षेत्र वाढत आहे. कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उन्हाळी धान पिकासंदर्भात गावागावांत जाऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून मार्गदर्शन केले आहे.

बाॅक्स

मका पिकाचे क्षेत्र चार पटीने वाढले

उन्हाळी धान पीक घेणारे अनेक शेतकरी यावर्षी रब्बी हंगामात मका पिकाकडे वळले. त्यामुळे मक्याचे क्षेत्र चार पटीने वाढले आहे. उन्हाळी धानापेक्षा मका पिकाचे उत्पादन अधिक व नफाही माेठ्या प्रमाणात मिळत असल्याने सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी धानपिकापेक्षा मका पिकाला अधिक प्राधान्य दिले. त्यामुळे मागील वर्षी १४५ हेक्टर क्षेत्रात मका पिकाची लागवड करण्यात आली होती; मात्र यावर्षी मका पिकाचे क्षेत्र चार पटीने वाढून ते थेट ५९८ हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे.

Web Title: Planting of summer paddy in 2117 hectare area in Armori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.